व्यक्ती लहान असो, तरुण असो किंवा वयोवृद्ध असो यांचे दात जर पांढरे शुभ्र असतील, तर ते बोलताना, हसताना समोरच्या माणसांवर नकळतच प्रभाव पाडून जातात. दातांमुळे व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्या माणसावर पडते. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य तुमच्या दंतपंक्तीमध्ये लपलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर आपली दंतपंक्ती पांढरी शुभ्र असेल, तर ते सौंदर्य अधिकच खुलून दिसते. प्रत्येकाला वाटते आपले दात शुभ्र असावेत, पण काहीवेळा दातांच्या पांढऱ्या रंगामध्येही कमी-जास्त प्रमाणातील छटा पाहावयास मिळतात, तर पिवळ्या दातांमुळे आपल्या सौंदर्यात काहीशी बाधा येऊ शकते.
पिवळ्या रंगाच्या एखाद्या दातामुळेही काहीशी नाराजी दिसून येते. यासाठी लहान मुलांना देखील सुरुवातीपासून आपले दात स्वच्छ कसे ठेवावेत, याचे संस्कार करणे गरजेचे ठरतात. दोन वेळा दात स्वच्छ घासण्याची सवय ज्याप्रमाणे पालक मुलांना लावतात, त्याचप्रमाणे स्वत:ही त्या सवयीचा अंगीकार केल्यास दात शुभ्र आणि स्वच्छ, दुर्गंधीमुक्त, शिवाय वाढत्या वयात दातदुखीपासूनही काहीशी सुटका होऊ शकते.
दातदुखी ही लहानपणापासूनच उद्भवणारी कटकट वाटते. याचे परिणाम लहान मुलांपासून अगदी तरुण, वयोवृद्धांपर्यंत भोगावे लागतात. लहानपणी मुलांना चॉकलेट देणे, दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे आदींमुळे काही परिणाम मुलांच्या दातांवर होऊ शकतो. लहान मुलांची एकाच ओळीतील दंतपंक्ती त्यांच्या इवल्याशा चेहऱ्याला खुलून दिसते. मात्र किडलेले दात, तुटलेले दात, दात-दाढदुखी यामुळे मुलेही बेचैन असतात.
एकदा पडून गेल्यानंतर येणारे दात हे नीट यावेत यासाठी कितीही प्रयत्न केले तरी काहीवेळी ते सरळ येत नाहीत, कधी वेडेवाकडे, तर कधी मागे-पुढे, तर कधी डब्बल दात असे येत असल्यामुळे समाजात वावरताना दातांमुळे कुणी नावं ठेवू नये. यासाठी आवश्यक ती ट्रीटमेंटही घेतली जाते. पांढऱ्या शुभ्र दातांसाठी प्रयत्न केले जातात. नव्याने दात पर्मनंटली बसवायचे असल्यास ते पांढरे शुभ्र असावेत यासाठी खास प्रयत्न केले जातात.
दात आपले सौंदर्य खुलवतात. दातांमुळे खुलणारं हास्य अधिक गोड वाटतं. त्याचप्रमाणे स्वच्छ, पांढऱ्या शुभ्र दातांमुळे आपली प्रतिमा उठून दिसते. दुर्गंधीमुक्त श्वासामुळे समोरच्या माणसाला तुमच्याशी बोलताना निश्चितच घृणा वाटत नाही. दात म्हणजे चेहऱ्याचं खरं सौंदर्यच. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा खरा हिस्सा. दातांमुळे आपले उच्चार खऱ्या अर्थाने स्पष्ट होतात. यामुळे आपले स्पष्ट बोलणे, स्पष्ट उच्चार, वक्तृत्वाची छाप समाजात पडते.
लहान मुलांसाठी दातांचा विचार केल्यास विशेषत: त्यांच्या बोलण्यावर परिणाम होताना दिसतो. लहान मुलं बोबडी बोलतात, आपणास त्यांचे बोबडे बोल हवेहवेसे वाटतात, पण ते विशिष्ट वयापर्यंतच. सात-आठ वर्षांनंतरही मुलं बोबडी बोलू लागली, तर ते नको वाटते. याचे कारण त्यांचे दात, मुलांना स्पष्ट बोलण्याची सवय लागावी यासाठी त्यांच्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे.
लहानपणी येणारे दात किमान सात वर्षापर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी मुलांच्या गोड पदार्थ, चॉकलेट खाण्याच्या सवयी, दातांची स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरुणपणीही दातांची काळजी तेवढीच घेणे आवश्यक आहे. कारण आपली दंतपंक्ती आपल्या चेहऱ्याबरोबरच आपलं सौंदर्यही खुलवतेच, शिवाय हसताना, बोलताना, पांढऱ्या शुभ्र, मजबूत दंतपंक्तीचे रहस्य काय याचीही चर्चा होते.