बाळाचा आहार सुरू होतो आईच्या पोटात असतानाच! गर्भारपणात आईने सकस आहार घेतला तर बाळाला सर्व आहारघटक योग्य प्रमाण मिळून बाळाची वाढ उत्तम प्रकारे होते. आहाराच्या प्रमाणापेक्षा या काळात आहाराची प्रत सुधारणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी प्रथिने (अंडी, डाळी व कडधान्ये, दूध), कॅल्शियम (नाचणी, राजगिरा, दूग्धजन्य पदार्थ, तीळ, बदाम), आणि लोहयुक्त पदार्थ (अळिव, बाजरी, खारीक, काळे मनुके, पालेभाज्या) यांचा आहारात समावेश करावा. या काळात घरचे ताजे अन्न घ्यायला घ्यावे व बाहेरचे अन्न, तळळेले पदार्थ, शीतपेये, अति-गोड पदार्थ टाळावे. गरोदरपणात होणाऱ्या वजनवाढीकडेही बारीक लक्ष द्यायला हवे. सर्वसाधारणपणे गर्भधारणेपूर्वी योग्य वजनाच्या स्त्रीचे गर्भारपणाच्या महिन्यात ते किलो वजन वाढणे अपेक्षित असते. गर्भधारणेपूर्वी वजन कमी किंवा जास्त असल्यास हे गर्भारपणातील वजनवाढीचे गणित बदलते.
0 ते 6 महिने : केवळ स्तनपान
बाळाचा जन्म झाल्यानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. सुरुवातीचे 2-4 दिवस येणारे पिवळसर दूध (कोलोस्ट्रम) म्हणजे बाळासाठी पहिले लसीकरणच! स्तनपानास विलंब केल्यास हेच दूध बाळाला मिळत नाही. जितके लवकर स्तनपान सुरू करू तितके दूध लवकर येते आणि तितक्याच लवकर आईची तब्येतही सुधारते. स्तनपानामुळे आई-बाळात भावनिक बंध तयार होतो. स्तनपानाला कोणतीही पूर्वतयारी लागत नाही, कोणताही खर्च नाही की जंतूसंसर्गाचा धोका नाही. पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानावर असणारी मुले सुदृढ तर असतातच, शिवाय त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे, अतिसाराचे प्रमाण अतिशय कमी असते. हे सगळे फायदे लक्षात घेऊन घरातील सर्वांनीच स्तनपानाला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यासाठी आईला योग्य सहकार्य केले पाहिजे.
6 ते 12 महिने : वरचे अन्न सुरू करणे
बऱ्याच घरांमध्ये, विशेषतः शहरांमध्ये बाळाला वरचे अन्न द्यायची घाई केली जाते. आईला नोकरीच्या ठिकाणी रुजू व्हायचे असते, दूध पुरत नाही किंवा बाळाचे पोट भरत नाही अशी शंका येते, रात्री उठून बाळाला स्तनपान द्यायचा कंटाळा येतो, बाळ खूप गुटगुटीत दिसावे असे वाटते म्हणून… अशी बरीच कारणे यामागे असतात. पण सहा महिन्यांच्या आधी वरचे अन्न सुरु करणे बाळासाठी चांगले नाही. बाळाची पचनशक्ती सहा महिन्यांत पुरेशी विकसित झालेली नसते. सहा महिन्यांच्या आधी वरचे अन्न सुरु केल्यास अपचन, अतिसार, जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. याउलट परिस्थितीदेखील काही ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागात, बघायला मिळते. वरचे अन्न सुरु करायला सहा महिन्यांपेक्षा जास्त उशीर केला जातो. हे देखील बाळाच्या वाढीच्या दृष्टीने चांगले नाही.
यामुळे बाळाची वाढ अपुरी होऊ शकते. सहा महिने ते 12 महिने (एक वर्ष) या काळात सुरुवातीला पातळ, मग काही काळानंतर मऊसर व पचायला सोपे अन्न द्यावे. या काळात सुरुवातीला तांदळाची पेज, डाळीचे पाणी, नाचणीची पेज, फळांचे रस, भाज्यांचे सूप व हे पचायला लागल्यानंतर मऊ खिचडी, फळांचा गर, मऊ शिजवलेल्या भाज्या, अंड्याचा पिवळा भाग, ताजे दही यांचा समावेश करावा. एक वर्षापर्यंतच्या काळात वरचे दूध, गहू, अंड्याचा पांढरा भाग, साखर व मीठाचा वापर पूर्णपणे टाळावा. वरचे अन्न तयार करताना आणि बाळाला देताना योग्य ती स्वच्छता पाळणे देखील जंतुसंसर्ग टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाचे वजन साधारण जन्मावेळेसच्या वजनाच्या तिप्पट व्हायला हवे.
1 ते 2 वर्ष : घरचे अन्न, आहारविषयक सवयी
बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर बाळाला घरचे सगळे अन्न देता येते. फक्त खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. या काळात बाहेरील अन्नपदार्थ विशेषतः बिस्कीटे, चिप्स, चॉकलेट्स देणे पूर्णपणे टाळावे. साखर, गूळ, मीठाचा वापर अगदी मर्यादित करावा. बाळ खात नाही म्हणून उठ-सूठ सगळ्यात साखर-गूळ-तूप घालू नये. या काळातच बाळाला आहारविषयक चांगल्या सवयी लावाव्या – जेवणाच्या आधी हात धुणे, आपल्या हाताने खाणे, सगळ्या भाज्या, फळे, डाळी, उसळी खाणे, पाण्याबरोबर न गिळता नीट चावून खाणे, अन्नाला नावे न ठेवणे, जेवणानंतर हात व तोंड धुणे, चुळा भरणे इ. बाळाबरोबर पालकांनीही काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या – टी.व्ही. किंवा मोबाईल दाखवत भरवणे, भूक नसतानाही जबरदस्ती खायला घालणे, जेवणात तूप-साखर/जॅम/सॉस/लोणचे असे पदार्थ देणे.