पुणे – मध्यमवयीन महिलांमध्ये अचानक उद्भवणारा स्तनांचा कर्करोग म्हणजे आयुष्य उध्वस्त करणारा असतो. मध्यमवयामध्ये अशा स्त्रीची मुले लहान असतात आणि मग कर्करोगाचे आक्रमण झाले, तर सुखी संसाराचे स्वप्न हवेतच विरून जाते. अशातच जर ती स्त्री गर्भवती असेल आणि तिला स्तनांचा कर्करोग झाला, तर एकाचवेळेस आई आणि भावी जीवाचे आयुष्यच पणाला लागलेले असते.
मात्र, पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील ब्रेस्ट सर्जरीचे सर्जन, स्त्री रोगतज्ज्ञ, कर्करोग विभाग आणि लहान मुलांच्या रोगांचे तज्ज्ञ असलेल्या टीमने एका ब्रेस्ट कॅन्सर पिडीत महिलेवर अत्यंत अवघड अशी केमोथेरपीची ट्रीटमेंट देण्याचा धोका पत्करत, आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यात य्श मिळवले आहे. “डर के आगे जीत हैं’ या म्हणीचा साक्षात अनुभव यावा अशी ही घटना वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
याविषयी पुण्यातील विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन दै. प्रभातच्या “आरोग्य जागर’च्या लेखिका डॉ. प्रांजली गाडगीळ यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, आमच्या हॉस्पिटलमध्ये स्तनांचा कर्करोग असलेल्या एका 26 वर्षीय महिलेने आपले नाव नोंदवले, जी तीन महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिच्यावर कर्करोग प्रतिबंधक उपचार करताना तिच्या गर्भाशयातील बाळाचा जीव वाचवणे हे आव्हान आमच्यासमोर होते. साधारणपणे सुमारे 3000 गर्भधारणांमध्ये एक अशा रुग्णाला ही जगावेगळी गुंतागुंत त्रासदायक ठरु शकते.
गरोदरपणात स्तनांच्या कर्करोगाचा उपचार करण्यासाठी निरोगी बाळाच्या सुरक्षित जन्मासह, आईसाठी ऑन्कोलॉजिकल प्रभावी उपचारांना संतुलित करणे आवश्यक असते. शिवाय सदर महिला ही पहिलटकरीण असल्याने आव्हान अधिकच मोठे होते. निदानानंतर आमच्या असे लक्षात आले की तिला कर्करोगाची कसलीही पार्श्वभूमी नव्हती आणि तिच्या स्तनातील गाठ ही जुनी फायब्रोडेनोमा होती.
कोणत्याही नवीन स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असलेल्या रूग्णांचे वय, कौटुंबिक इतिहास किंवा गर्भधारणा किंवा स्तनपान यासारख्या गोंधळजनक परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नव्हते. जेव्हा एखादी रुग्ण गर्भवती असते तेव्हा स्तनाचा कर्करोगाच्या उपचारातही काही अडचणी असतात. गर्भधारणेदरम्यान रेडिएशन कधीही देता येत नाही. तसेच गर्भविकासाचा महत्त्वपूर्ण टप्प्य असलेल्या पहिल्या तिमाहीत केमोथेरपी दिली जाऊ शकत नाही. शिवाय गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात शस्त्रक्रियेसाठी सामान्य भूल टाळावी लागते.
मग मी आणि मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील यांनी गर्भधारणेदरम्यान आणि शस्त्रक्रिया होण्यापूर्वी केमोथेरपी घेण्याची योजना आखली. सदर रुग्ण गर्भवती असल्याने मास्टॅक्टॉमी अर्थात स्तन पूर्ण काढून टाकणे शक्य नव्हते. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार करण्यात आला. मग सदर रुग्णाला गरोदरपणात साप्ताहिक केमोथेरपीची सायकल मिळाली.
स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्योती अग्रवाल यांनी गर्भाच्या विकासावर लक्ष ठेवले, काळजीपूर्वक औषधोपचार, आहारविषयक सल्ला आणि मानसशास्त्रीय समुपदेशन, बाळाच्या वाढीस मदत केली आणि चांगल्या उपचाराचा परिणामही चांगला होत गेला आणि हळूहळू ती गाठ कमी होत गेली.
केमोचे 12 वे सायकल पूर्ण केल्याच्या दोन आठवड्यांनंतर सदर महिलेने तिची शेवटची तिमाही पूर्ण केली आणि 39 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर निरोगी बाळाला जन्म दिला. प्रसुतीवेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबेही उपस्थित होते. बाळाचे वजन सामान्य वजन 3.3 किलो होते आणि बाळाला कोणताही आजार नसल्याचे दिसून आले. आता सदर महिलेची पुढील उपचाराची धुरा डॉ. विकास कोठावदे सांभाळत आहेत.
एका अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात होत असून संबंधित डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदन केले जात आहे.