नवी दिल्ली – भारत हा असा देश आहे, ज्याठिकाणी वर्षभर सतत जगभरातील पर्यटक येत असतात. जगभरातील पर्यटकांच्या यादीत जे महत्त्वाचे देश असतात त्यामध्ये भारतही वरच्या क्रमांकावर असतो. विशेषतः भारतातील काही शहरे अशी आहेत की ज्याठिकाणी लोक पुन्हा पुन्हा जाणे पसंत करतात. अशा शहरांविषयी…
गोवा – गोवा हे पश्चिम किनारपट्टीवर वसलेले राज्य असून ते भारतातील सर्वात लहान राज्य आहे. गोवा हे समुद्रकिनारे, नाइटलाइफ, सीफूड यासाठी ओळखले जाते. गोवा हे समुद्रकिनारी असलेले गंतव्यस्थान आहे आणि केवळ काही ठिकाणांपैकी एक आहे जे 24 तास खुले असते. गोव्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत जी परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. गोव्यातील लोक पर्यटकांशी खूप मैत्रीपूर्ण आहेत आणि वर्षभरात अनेक सण एकत्र साजरे करतात. गोव्याला पूर्वेचा रोम म्हणूनही ओळखले जाते. प्राचीन मंदिरे, चर्चची देखणी स्थापत्यकला, बीचेस, निसर्गसुंदर धबधबे ही गोव्याची ओळख आहे. नाईट लाईफचा आनंद घेण्यासाठी गोव्यातील बहुतांश ठिकाणी शेकडो क्लब तयार झाले आहेत. पण यावेळी दक्षिण गोव्यातील लेपर्ड व्हॅली हे एक नवीन ठिकाण म्हणून उदयास येत आहे, जिथे रात्रीच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे 3D लेझर लाईट शो आणि उत्तम संगीत लोकांची सहल संस्मरणीय बनवते. अनेक बीचवर पार्ट्याही होतात.
आग्रा – ताजमहाल, आग्रा किल्ला व फत्तेपूर सिक्री ह्या तीन ऐतिहासिक व युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने असलेले आग्रा भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. आग्र्यात जगभरातून पर्यटक येतात ते ताजमहाल पाहण्यासाठी. त्याखेरीज आग्र्यातील किल्ला किल्ला मुघलकालीन काळात बनलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक मुख्य किल्ला आहे. या किल्ल्यावर केल्या गेलेल्या रेखीव व कोरीव स्वरूपातील विलक्षण नक्षीदार कामगिरीमुळे युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे.
पाँडिचेरी – पाँडिचेरी ही एकेकाळी फ्रेंचाची वसाहत असल्याने याची रचना अतिशय टुमदार आहे. त्याचबरोबर योगी अरविंदांच्या आश्रमामुळे या ठिकाणाची किर्ती जगभर पोचली आहे. आजही याठिकाणी फ्रेंच वास्तुकलेचा प्रभाव असलेल्या अनेक इमारती, घरे दिसतात.
वाराणसी – पवित्र गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या वाराणसीला प्राचीन परंपरा लाभलेली आहे. काशी विश्वनाथाच्या मंदिर परिसराचा आता पुनर्विकास केला असल्याने हा परिसर अतिशय सुंदर व देखणा झालेला आहे. काशीतील गंगा किनाऱ्यावरील विविध घाट आणि रोज संध्याकाळी होणारी गंगेची आरती हा देशातील तसेच परदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळेच भारतीय संस्कृती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने वाराणसीला येत असतात.
ऋषिकेश – ऋषिकेशला जगाची योगसाधनेची राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच याठिकाणी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. याठिकाणी तुम्हांला विविध प्रकारचे आश्रम आढळतील. त्याठिकाणी ध्यान व योगाचे प्रशिक्षण दिले जाते. अध्यात्माची ओढ असणारे अनेक परदेशी पर्यटक याठिकाणी अनेक दिवस मुक्काम करण्यासाठी येतात.
जैसलमेर – थारचे वाळवंट आणि जैसलमेर किल्ला हा पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला आहे. लक्झरी रेगिस्तान कॅम्प्स, कठपुतळी शो, उंट सफारी, रात्री होणाऱ्या संगीताच्या मैफली ही इथली वैशिष्ट्ये परदेशी पर्यटकांना भुरळ पाडतात.
धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) – निसर्गसुंदर अशा कांगडा खोऱ्यात वसलेल्या धर्मशाळा या ठिकाणी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. तिबेटहून आलेल्या निर्वासितांना भारताने याठिकाणी आश्रय दिला असल्याने हे ठिकाणी गेल्यावर आपण एका वेगळ्याच ठिकाणी गेल्याचा अनुभव येतो. तिबेटींचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांचेही याठिकाणी वास्तव्य असते. त्याखेरीज या परिसरात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे असल्यान परदेशी पर्यटकांची याठिकाणाला पसंती असते.