वाराणसी – वाराणसीमध्ये अनेक चविष्ट पदार्थ वर्षभर मिळतात. त्याठिकाणी काशी विश्वनाथाच्या नैवेद्यात मलई मिठाईबरोबरच मगही पानाचाही समावेश असतो. अशा या धार्मिक स्थळी गेल्यावर देवदर्शनानंतर जिभेला तृप्त करायला विसरून नका. वाराणसीला काशी, बनारस अशा नावांनी देखील ओळखले जाते. या धार्मिक शहरातील खाद्यसंस्कृतीविषयी…
गुलाबी थंडीला सुरूवात होते आणि वाराणसीतील खाद्य संस्कृती आणखी बहरू लागते. तुम्ही वारणसीला केव्हाही गेलात तरी संकटमोचन हनुमान मंदिरातील प्रसादाचा लाल पेढा खाल्ला की, प्रसादाबरोबरच मलईयुक्त पेढ्याची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. मलई मिठाई, लौंगलता, लस्सी आणि मगही पानाची ख्याती तर बॉलीवुडने देशभर पोचवली आहे.
मगही पान – खईके पान बनारस वाला हे गाणे प्रत्येकाने कधी ना कधी गुणगुणलेले असते. या पानाचे वैशिष्ट्य म्हणजे काशी विश्वनाथाला जो नेवैद्य दाखवला जातो त्यामध्येही मगही पानाचा समावेश असतो. रोजच्या नैवेद्याच्या पानात बाबा विश्वनाथांसाठी हे पान ठेवले जाते. मगही पानाबरोबरच मीठा पान, सुरती पान, साधे पान, मसाला पान अशी विविध प्रकारची पाने वाराणसीमध्ये मिळतात. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात आणि पानाची ऑर्डर दिली तर अक्षरशः पन्नास-साठ प्रकराच्या चवीची पाने तुमच्यासाठी उपलब्ध असतील. वाराणसीत पान खाणे ही सहज सवय आहे. त्यामुळे जसा चहा पिण्यासाठी काळ-वेळ नसते तसेच वाराणसीमध्ये पान खाण्यासाठी काळ-वेळ पाहिली जात नाही.
कचोरी-भाजी – वाराणसीतील लोकांचा दिवसच कचोरी आणि भाजीने सुरू होते. कचोरी खाणारा प्रत्येकजण त्याबरोबर बटाट-कोहळा-हरबऱ्याची मिक्स मसालेदार भाजी त्याबरोबर चवीने खातो. दिवसाच्या नाश्त्याची सुरवातच कचोरी-भाजीने होते. कचोरी-भाजी खाल्ल्यानंतर गरमागरम वाफळलेला चहा ठरलेला असतो.
लौंगलता – ही वाराणसीतील पारंपारिक मिठाई मानली जाते. गोड खोया म्हणजेच माव्यात लवंग कुटून टाकली जाते. त्यामुळे माव्याला गोडव्याबरोबरच लवंगेचा तडका प्राप्त होतो. लवंग असल्यामुळे ही मिठाई खाल्ल्यानंतर तोंडही सुवासिक होते. लौंगलता वेगवेगळ्या आकारातील असते.
मलई – असे सांगितले जाते की हवेतील बाष्प किंवा पावसाच्या पाण्यापासून ही मिठाई तयार केली जाते. दूध, केशर चांगल्या प्रकारे घोटून घेतले जाते आणि त्यातून निघालेल्या क्रीमच्या फेसापासून ही मलई तयार केली जाते. पिवळ्या रंगाची ही मिठाई केशरयुक्त दुधाबरोबर खाल्ली जाते. ती खाल्लायवर तुम्हांला कळणारही नाही की, आपण काय आणि केव्हा खाल्ले. खाल्ले की पिले की फक्त हवा खाल्ली, अशा प्रश्न पडेल. कारण जिभेवर ठेवताक्षणी ही मलई विरघळून जाते आणि स्वाद आणि सुगंधामुळे आनंदाची वेगळीच अनुभूती मिळते.
गीली पकौडी – या पदार्थाला सकोडा असेही म्हटले जाते. गीली पकोडी पाहिल्यावर तुम्हांला तर्रीदार रस्सा आणि भज्याची आठवण होईल. मातीच्या कुल्हडमध्ये देशी तूप आणि लिंबू पिळून त्याबरोबर मसाल्याचा शोरबा आणि सोयाबीनचे तुकडे टाकले जातात. त्याचबरोबर पालकची दोन भजी टाकली जातात. हा पदार्थ जेव्हा समोर येतो तेव्हा कुणाच्याही तोंडाला पाणी सुटते. एक घास तोंडात टाकताच तिखटाची एक किक संपूर्ण शरीराला जाणवते. मग गीली पकौडी रोजच खावीशी वाटू लागते.
लस्सी – बनारसी लस्सीची स्वतःची वेगळी चव असते. बनारसमध्ये लस्सीमध्ये रबडी मिसळलेली असते आणि काही प्रमाणात भांगही मिसळलेली असते. बनारसमध्ये लस्सीच्या दुकानांनी इतकी लोकप्रियता मिळवलेली आहे की, रामनगर की लस्सी, पाल की लस्सी, पहलवान लस्सी, ब्लू लस्सी असे विविध ब्रँड लोकप्रिय झाले आहेत. उन्हाळ्यात तर लस्सीला तुफान मागणी असते. त्या काळात लस्सीमुळे केवळ उर्जा मिळत नाही तर माणूस ताजतवाना होतो.
थंडाई – पाकिस्तानात थंडाईला सरदई म्हटले जाते तर बनारसमध्ये आम नावाने ती ओळखली जाते. मावा, दूध आणि मलईबरोबर काही सुगंधित वनौषधी घालून तयार केलेल्या थंडाईला कायम मागणी असते. उन्हाळ्यात तर ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते.
लाल पेढा आणि तिरंगा बर्फी – खवा भाजून हा पेढा तयार केलेला असतो. त्यामुळे तो लालपेक्षाही चॉकलेटी रंगाचा दिसतो. संकटमोचन मंदिराखेरीज अन्यत्रही हा पेढा मिळतो. हा पेढा खाल्ल्यावर माणूस चॉकलेट खायचे विसरून जाईल इतका हा स्वादिष्ट असतो. विशेष मावा आणि दूध घोटून घोटून तयार केलेले लाल पेढे चविष्ट असतात. त्याखेरीज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती या दिवशी शहरात सगळीकडे तिरंगी बर्फी मिळते.
कुल्हड चाट – काशी चाट भांडार, दीना चाट भांडार, भोला की चाट, बनारसी चाट अशी चाटची असंख्य दुकाने तुम्हांला दिसतील. सगळ्याच आचाऱ्यांच्या हातात कुल्हड चाट तयार करण्याची एक कला आहे. कुल्हडमध्ये छोले आणि समोसे वर दही, चटणी, मसाले टाकून देण्याची देखील परंपरा वाराणसीमध्ये आहे.
जिलेबी – वाराणसीमध्ये जिलेबी हा सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. दही-जिलेबी, रबडी-जिलेबी अशा प्रकारतही जिलेबी मिळते. गुळाची जिलेबी, कुरकुरीत आणि रसदार बडका जिलेबी लोक आवडीने खातात. अनेक ठिकाणी जिलेबीसाठी ग्राहकांची एवढी गर्दी असते की, चुलकांडावरून जिलेबी काढली आणि पाकात टाकेपर्यंत संपलेली असते.
वाराणसीत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळत असले तरी कुल्हडमध्ये अन्नपदार्थ वाढण्याची जी पद्धत आहे आणि त्यामुळे पदार्थाला जी वेगळी चव प्राप्त होते ती देशात अन्यत्र कुठे क्वचितच मिळते.