पुणे – प्राण्यांपासून पसरणाऱ्या अनेक संसर्गजन्य रोगांबद्दल तुम्ही ऐकले असेलच. ‘रेबीज’ हा या धोकादायक आजारांपैकी एक आहे. रेबीज इतका धोकादायक आहे की तो रुग्णाचा जीवही घेऊ शकतो. आज 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन आहे. दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज सारख्या घातक रोगास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
रेबीजबद्दल बोलायचे झाले तर काही प्राण्यांच्या चाव्याव्दारे हा आजार होतो. जेव्हा संक्रमित प्राणी एखाद्या व्यक्तीला चावतात तेव्हा त्यांची लाळ त्या व्यक्तीच्या रक्तात मिसळते, ज्यामुळे रेबीजचे जंतू व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. मिळालेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी 20 हजार लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होत असल्याचं सांगण्यात आले आहे.
रेबीज रोग काय आहे?
रेबीज रोग संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग कुत्रा, माकडे आणि मांजरांच्या चाव्याव्दारे पसरतो आणि या संक्रमित प्राण्यांच्या लाळेमध्ये आढळणारे जंतू रक्तात मिसळतात आणि संसर्ग पसरतात.
आजकाल पाळीव प्राण्यांना रेबीजची लस मिळू लागली असली, तरी भटक्या प्राण्यांना रेबीजची लस मिळत नाही आणि त्यामुळेच ते रेबीज आजाराचे मोठे वाहक बनतात.
रेबीजची लक्षणे काय आहेत…
रेबीजची लागण झालेला प्राणी माणसाला चावल्यास त्याची लक्षणे एक ते तीन महिन्यांत दिसू लागतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे दहा दिवसांनंतरही दिसू लागतात आणि काही प्रकरणांमध्ये आठ महिन्यांनंतरही सौम्य लक्षणे दिसतात.
या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, अंगदुखी, मळमळ, थकवा, अस्वस्थता, निद्रानाश आणि सतत चक्कर येणे यांचा समावेश होतो. त्याची लक्षणे दुर्लक्षित राहिल्यास रेबीज इतका गंभीर होतो की अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो.
The post काळजी घ्या, उपचार करा… ‘रेबीज’ रोगाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, अन्यथा होईल मृत्यू ! appeared first on Dainik Prabhat.