नवी दिल्ली – केवळ जिममध्ये सकाळ-संध्याकाळ घाम गाळून आणि पौष्टीक आहार खाऊन तंदुरुस्त आणि निरोगी राहात येत नाही तर त्यासाठी जीवनशैलीचा आणि दैनंदिनीचाही विचार करावा लागतो, असे मत दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. के. पांडे यांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता दीपेश भानचे क्रिकेट खेळताना ब्रेन हॅमरेज होऊन निधन झाले. आठवड्यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला. गेल्यावर्षी तरूण अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूलाही अशा घटना कानावर पडतात किंवा अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत हे घडल्याचे अनुभवायला आलेले असते.
तरुणांमध्ये हृदयविकाराच्या समस्यांचे वाढते प्रमाण, अतिरेकी व्यायाम आणि जिममध्ये हृदयाचा त्रास जाणवू लागणे, अशा गंभीर घटनांत मृत्यू होणे असे प्रकार तरुणांमध्ये तसेच चाळीशीतील व्यक्तींमध्येही दिसू लागले आहेत. रोजच्या कामात असणाऱ्या, चालत्याबोलत्या तरुण व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सध्या सेलिब्रिटीजपासून ते गल्लीतील तरुणांपर्यंत सगळ्यांमध्ये तंदुरुस्त, सिक्स पॅक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी अनेक तरुण तासन् तास जिममध्ये घाम गाळताना दिसतात. त्याचबरोबर अनेकजण प्रोटीन पावडर, स्नायू बळकट बनवणारी औषधे घेत असतात. अशा पावडरींचा खपही वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या कारणांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत आणि कधीकधी जीवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे याचा विचार करण्याची तीव्रतेने गरज निर्माण झालेली आहे.
तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी पौष्टीक आहार आणि नियमित व्यायामाबरोबरच किमान सात तासांची सलग, गाढ आणि शांत झोप तसेच तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याची गरज असते. बदलत्या काळात कितीही तीव्र स्पर्धा असली तरी रोज सकाळी उठून पळायला सुरवात करायची, जेवणखाण विसरून काम करत राहायचे, रात्री उशीरा घरी आणि सकाळी परत कामाच्या दिशेने पळायला सुरवात करायची यात मन आणि शरीरावर येणारा ताण किती असतो आणि आपण त्याकडे सहजपणे का दुर्लक्ष करत राहतो याचा विचार करण्याची गरज आहे. अनेकदा दुपारच्या जेवणाकडे दुर्लक्ष होते. डबा खायलाही वेळ मिळत नाही.
रात्री उशीरा दमून घरी आल्यावर कुटुंबातील सदस्यांशी बोलायला वेळच नसतो. कसेबसे दोन घास पोटात टाकले की पुन्हा मोबाईल किंवा लॅपटॉपवर काहीतरी करत बसायचे. झोपायची वेळ उलटून गेल्याचेही कळत नाही. या सगळ्या गोष्टींना शिस्त लावण्याची गरज असते. कुणीही काहीही म्हटले तरी आपल्या मर्याद ओळखूनच किती स्पर्धा करायची आणि कुठले मैदान मारायचे हे ठरवावे लागते. प्रत्येकजण जनरल मॅनेजर होऊ शकत नसतो. प्रत्येकाला अलिशान फ्लॅट, गाडी, फार्महाऊस असे जमणार नसते. ज्यांनी जमवून आणलेले असते त्यांचा संघर्ष आणि दुःखे आपल्याला माहित नसतात.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सकाळी नियमित व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार घालावेत. व्यायामासाठी किमान तीस मिनिटे ते 45 मिनिटांचा वेळ द्यावा. रोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी पोटभर नाश्ता करून मगच निघावे. याबाबत कोणतीही पळवाट शोधणे आणि रोज नाश्त्याबाबत चालढकल करत राहणे म्हणजे स्वतःच्या आरोग्यावर कुऱ्हाड मारण्यासारखे असते. धावपळीच्या जीवनशैलीतील काही गोष्टींवर काट मारून, शरीराला झेपेल आणि मन आनंदी व प्रसन्न राहिल अशा पद्धतीची जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. अन्यथा शरीराला ताणत राहिले तर त्याचा प्रतिकूल परिणाम हृदयासह वेगवेगळ्या अवयवांवर होत राहतो आणि एक दिवस हे अवयव थकून काम करण्यास नकार देतात.