पुणे- उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून सावध राहणे तर आवश्यक आहेच; परंतु सर्वाधिक धोकादायक ठरणाऱ्या मूत्रपिंडाच्या संसर्गापासून काळजी घेणे अत्यंत आवश्यकच आहे.
तुम्हाला मूत्रिपंडाचा त्रास असल्यास पाणी कमी प्या. एअर कंडिशन किंवा गार असलेल्या जागी बसा. तसेच, सामान्य नागरिकांनी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे, तुम्ही मूत्रपिंड विकारांना निश्चित प्रतिबंध करू शकता, असा विश्वास मूत्रपिंडविकार तज्ज्ञांनी व्यक्त केला.
उन्हाळा वाढतो तसतसे मूत्रपिंडाचे आजारही वाढतात. याला प्रतिबंध करण्यासाठी आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणे आणि पाणी, सरबत, नारळ पाणी, फळांचा रस असे द्रव पदार्थ घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
आधीपासून मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांनी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे.
सामान्य माणसांना शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी झाल्याने मूत्रिंपाडाची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.
उन्हाळ्यात काय खावे
– कलिंगड, टरबूज, खरबूज, वेगवेगळी सरबते, नारळाचे पाणी, चांगली निरा खाल्यास परिस्थिती नियंत्रणात येते.
वाळ्याचे पाणी, तुळशीचे बी यातून उन्हाळ्यातील मूत्रपिंड विकार नियंत्रित ठेवता येतो.
उन्हाळ्यात नेमके काय होते?
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डिहायड्रेशनमुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यातून मूत्रपिंड विकार होण्याची शक्यता वाढते.
उन्हाळी लागणे
उन्हाळ्यात हवा गरम असते. त्यात द्रव पदार्थ कमी घेतल्यास मूत्रपिंडाचा त्रास सुरू होतो. त्यातून उन्हात प्रवास केल्यास उन्हाळी लागते.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा थेट परिणाम सर्व वयोगटात मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यातून मूतखडा होण्याची प्रक्रिया सुरू राहाते. काही रुग्णांना मूतखडा असतो. तो अडकल्यास अक्षरशः असह्य वेदना होतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. – डॉ. सुरेश पाटणकर, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ, एस. हॉस्पिटल