सर्वसामान्यपणे जीवनात संवाद साधण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करावयाचे असेल तर योग्य पद्धतीने प्रभावी संवाद करून अपेक्षित प्रतिसाद मिळवता येतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल तर संभाषणाची कला आवश्यकच ठरते.
समाजकारणात किंवा राजकारण करताना कोणतीही गोष्ट संवादाविना समाधानकारकरित्या साध्य होऊच शकत नाही. संभाषण कौशल्य म्हणजे आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला, श्रोत्याला समजावून सांगणे. जो राजकारणातील एक अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. कारण आपले मुद्दे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे तेवढे सोपे नसते, हे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा लक्षात येते.
आपले संभाषण कौशल्य अनेक अवघड गोष्टी सोप्या करते. उत्तम संभाषणामुळे अनेक माणसं भावनिकरित्या जोडली जातात.संभाषणात अनेक लहान मोठ्या गोष्टींचा समावेश होतो. राजकारणात किंवा समाजकारणात काम करताना भाषण करणाऱ्या व्यक्तीचे एक स्थान असते. भाषण ही एक कला आहे. वक्ता दश सहस्त्रेषू.. काहींना ही कला जन्मजात असते. तर काही लोक ती प्रत्यनपूर्वक आत्मसात करतात. नेतृत्व करत असताना भाषण कसे दर्जेदार होईल याकडे आपण लक्ष देतो. तसेच ते भाषण समोरच्याला आपल्या बोलण्यात कसे गुंतवून ठेवते, ते महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच आपले संभाषणसुद्धा उत्तम असले पाहिजे. यासाठी आपण जागरूक असणे गरजेचे बनले आहे. म्हणून राजकारणातील महिलांनी संभाषण कौशल्य प्रयत्नपूर्वक आत्मसात केले पाहिजे असे मला वाटते. राजकीय कार्यक्रमांमध्ये होणारे महिलांचे संभाषण बघितले तर लक्षात येते महिलांमध्ये खूपच जास्त त्रुटी असतात.
संभाषणातील मागासलेपणा आपणास पाहावयास मिळतो. पूर्वी राजकीय कार्यक्रमसाठी घराबाहेर न पडणाऱ्या महिला जेव्हा आरक्षणामुळे किंवा पदामुळे अचानक लोकांमध्ये बाहेर येतात तेव्हा त्याना खूप बुजल्यासारखे वाटते. त्यामुळे त्या संभाषणासाठी स्वतः पुढाकार घेत नाहीत. आणि मग इतर जर कोणी काही बोलले तर विचारलेल्या प्रश्नाची फक्त हो, नाही अशी उत्तरे देतात. आणि संभाषण आटोपते घेतात. किंवा एखाद्या पदावरची महिला स्वतःबद्दल किंवा इतर काही गोष्टींबद्दल सुरवात करते आणि थांबताच नाही. संभाषात फक्त ऐकणे किंवा फक्त बोलणेच अपेक्षित नसते. एक चांगला संवादक होण्यासाठी आधी आपण एक चांगला श्रोता झाले पाहिजे. इतरांना काय म्हणायचे आहे याचा आदर करणे हा संवादाचा मुख्य पैलू आहे. दुसऱ्याचे ऐकून घेणे हीसुद्धा एक वेगळी कला आहे. त्यामुळे एक तर ती दुसरी व्यक्ती आपणाशी जोडली जाते. ऐकून घेतल्यामुळे आपलेपणा निर्माण होतोच. आणि त्याशिवाय एखादी गोष्ट आपणाला त्यांना पटवून सांगायची असेल तर ते सोपे होते. एका सर्वेक्षणानुसार संभाषणात 7 टक्के शब्द महत्वाचे असतात.
38 टक्के तुमचा आवाज. ज्यातून तुम्ही नम्रता, संवेदनशीलता, आक्रमकता, अहंपणा, मग्रुरी यारख्या गोष्टी श्रोत्यांपर्यत पोचत असतात. आणि राहिलेली टक्केवारी ही तुमची देहबोली. देहबोली म्हणजे आपण वागतो कसे, बोलतो कसे याबरोबरच आपली दृष्टी, आपले हावभाव. देहबोलीतून इतरांची आपुलकी मिळवता येते. मात्र, महिलांनो आपण याबाबत जास्त सावध राहिले पाहिजे. आपल्या देहबोलीतून खूप संदेश जात असतात. त्याचे अर्थ, विपर्यास काही लोक आपापल्या पद्धतीनुसार करत असतात. त्यामुळे आपल्या बोलण्यातून विद्वत्ता, संस्कार, शिक्षण, चालण्यातून आत्मविश्वास दिसला पाहिजे. संभाषण ही जन्मजात येणारी गोष्ट नसते. त्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतात. हे तितकेसे सोपे नसले तरी सराव करत राहिल्याने या गोष्टी साध्य होतात. मात्र, राजकारणात काम करताना अनेक गोष्टींसाठी पाठपुरावा करावा लागतो.
लोकांची कामे समजावून घ्यावी लागतात. लोकभावना जाणा6या लागतात. नेत्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी बोलावं लागते. ज्यावेली आपण चांगले संभाषण करू शकू त्यावेळी आपली काम सहजसाध्य होण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजेच आपण त्यांच्याशी योग्य पद्धतीने बोलणे उपयुक्त ठरते. आपल्याकडे एक म्हण आहे… बोलणाऱ्याची माती पण विकली जाते पण न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही. त्यानुसार संभाषणकरण्याची कला आपण जाणूनबुजून अंगी बाणवली पाहिजे.
पुढे पुढे कदाचित पदाची हवा डोक्यात जाते, अहंभाव वाढीस लागतो. मला सगळं काही कळतं असे वाटतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे न ऐकता आपण आपली मते त्यांच्यावर लादतो. त्यामुळे आपली चुकीची प्रतिमा तयार होण्यापासून सावध असले पाहिजे. संभाषणातून आपले आचार, विचार, उच्चार प्रदर्शित होत असतात. म्हणून केवळ संभाषण कला आली की आपण जिंकलोच असेही समजता कामा नये. जिथे जसे संभाषण करणे गरजेचे आहे, तिथे तिथे त्याच पद्धतीने संभाषण करता आले पाहिजे. या कलेचा उपयोग आपण सौजन्यशीलतेने, नम्रतेने आणि व्यवहार कुशलतेने केला तरच आपणास हवे ते इस्पित साध्य करता येईल, हेही लक्षात घेणे खूप आवश्यक ठरते.
The post उत्तम संभाषण करण्याची कला आत्मसात करण्याची गरज appeared first on Dainik Prabhat.