ईअर फोन हा खरं तर आजच्या तरुणाईच्या दैनंदिन गरजेचा एक घटक बनला आहे. चालताना, गाडीवर असताना अथवा इतर वेळेसही हा ईअर फोन कानात नसेल तर त्यांना अगदी चुकल्यासारखे होते. इथूनच खरी सुरुवात होते ध्वनिप्रदूषणाची. कानात घातलेला तो ईअर फोन आणि त्याचा आवाज याने तुमच्या पूर्ण कानांचा ताबा घेतलेला असतो. कानात घालून गाणी ऐकताना तो आवाज शेजारी असणाऱ्यालाही ऐकू येईल इतकाही तो बऱ्याचदा मोठा असतो. आपण ऐकत असलेल्या ईअर फोनमधून येणारा आवाज जर शेजारच्याला ऐकू आला तर तो 80 डी.बी. चा असतो. असा आवाज सतत कानावर पडला तर बहिरेपणा येतो. हे इअरफोन सतत कानावर ठेवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
लहान मुलांच्या कानाजवळ मोबाईल/फोनचा रिसिव्हर नेऊ नये. लहान मुलांच्या कानाचा पडदा नाजूक असतो. मोठ्या आवाजाने तो फाटू शकतो. अशाने बहिरेपणा येऊ शकतो. भारतात आवाज केला तरंच सण साजरा केल्यासारखे वाटते. आवाज करून आनंद व्यक्त करणे ही खरं तर पशूंची पद्धती. ती अवलंबणारे अर्थातच पशूमानव. त्यामुळे त्यांना कळते ती भाषा रंगाची, शिक्षेची.
परंतु सण-उत्सवांच्या काळात तीच माणसे कित्येक वर्षे कायदापालन कधीच करीत नाहीत. त्यांना शिक्षा झाल्याचे आजवर ऐकिवात नाही. पोलीस हे, राजकीय पुढारी यांचे साटेलोटे असल्यावर सामान्य नागरिकांना याबाबतीत कायदा करूनही न्याय मिळेल हे संभवनीय नाही. तरीही प्रत्येक नागरिकाने जागृत राहिले, कायदा पाळण्याचा आग्रह धरला तर कदाचित कालांतराने ध्वनिप्रदूषण कमी होईल.
या सर्व प्रकारात आणखी एका नियमाची भर पडली ती 24 तास दुकाने मॉल बाजारपेठा उघड्या ठेवण्याच्या निर्णयाची. मग लोकांच्या झोपेचे खोबरे झाले तरी चालेल. कायदा सोडला तरी चालेल परंतु उद्योगाला चालना मिळायला हवी. व्यापार वाढायला हवा. पेशंट वाढले नाहीत तर डॉक्टर्स जगणार कसे? मग ध्वनिप्रदूषण कायदा काहीही सांगो. आम्ही दुट्टपी वागणार का तर पैसा हवा म्हणून. ही मनोवृत्ती आजकाल सर्वांचीच असल्याचे दिसून येते.
तेव्हा नागरिकांनो जागृत व्हा. एखादा दिवस शांत नीरव परिसर शोधून काढा. शांततेचा अनुभव घ्या. तुमचे डोक शांत राहील. चित्त स्वस्थ राहील. बुद्धीला चालना मिळेल. आपल्या टीव्हीचा म्युझिक सिस्टिमचा, मोबाइलचा आवाज कमीत कमी ठेवा. आपण किती मोठ्याने बोलतो, आपण वापरत असलेल्या यंत्रांचा किती आवाज होतो, यासाठी डेसिबल मीटरने आवाज मोजा. 100 पैकी 90 टक्के लोक एरवीही शेजाऱ्याला ध्वनिप्रदूषणाचा त्रास होईल असे वागत असतील असे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा शांत राहा आणि इतरांनाही शांतता देण्याचा प्रयत्न करा. थोडा विचार करा. बाहेरच्या आवाजापेक्षा आतला आवाज ऐका.
24 तास दुकाने उघडी ठेवणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या तसेच ध्वनिप्रदूषण होणाऱ्या प्रस्तावाला कडाडून विरोध करा. विशेषतः ज्याचा त्रास सण-उत्सवकाळात जास्त होतो अशा उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी 100 नंबरला फोन करा. किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करा. लेखी तक्रार द्या/ पाठपुरावा करा/यश येईल, शांततेने जगता येईल. अजून किमान 1-2 पिढ्यातच हा त्रास कायमचा संपेल कारण तोपर्यंत भारतीय माणसे ठार बहिरी झालेली असतील.