सध्या भारतासमोर बालकांमधील कुपोषण, अतिसार, रक्तक्षय, स्थूलता या आहारविषयक समस्या आहेत. बालकांमधील या समस्यांचे मूळ सुरुवातीच्या तीन वर्षांमधील आहारात आणि आरोग्यातच दडले आहे.
गर्भधारणेत आईचा आहार
बाळाचा आहार सुरू होतो आईच्या पोटात असतानाच! गर्भारपणात आईने सकस आहार घेतला तर बाळाला सर्व आहारघटक योग्य प्रमाण मिळून बाळाची वाढ उत्तम प्रकारे होते. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीच आरोग्य सुधारून आईने गर्भारपणात समतोल, सकस आहार घ्यायला हवा. आहाराच्या प्रमाणापेक्षा या काळात आहाराची प्रत सुधारणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी प्रथिने (अंडी, डाळी व कडधान्ये, दूध), कॅल्शियम (नाचणी, राजगिरा, दुग्धजन्य पदार्थ, तीळ, बदाम) आणि लोहयुक्त पदार्थ (अळिव, बाजरी, खारीक, काळे मनुके, पालेभाज्या) यांचा आहारात समावेश करावा. सर्वसाधारणपणे गर्भधारणेपूर्वी योग्य वजनाच्या स्त्रीचे गर्भारपणाच्या 9 महिन्यांत 10 ते 12 किलो वजन वाढणे अपेक्षित असते. ठराविक वेळी सोनोग्राफी करून बाळाचे वजन नीट वाढत आहे की नाही याची खातरजमा करावी. प्रसूतिवेळी बाळाचे वजन 2.5 किलो ते 3.5 किलोपेक्षा जास्त भरल्यास बाळाला भविष्यात काही आजारांचा धोका वाढतो.
पहिले सहा महिने केवळ स्तनपान
स्तनपानाविषयी समाजात अनेक गैरसमज आढळतात. अनेकदा बाळाला पावडरचे किंवा वरचे दूध पाजले जाते. त्यासाठी बाटलीचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. खरंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर 1 तासाच्या आत बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. सुरुवातीचे 2-3 दिवस येणारे पिवळसर दूध (कोलोस्ट्रम) म्हणजे बाळासाठी पहिले लसीकरणच! स्तनपानास विलंब केल्यास हेच दूध बाळाला मिळत नाही. जितके लवकर स्तनपान सुरू करू तितके दूध लवकर येते आणि तितक्याच लवकर आईची तब्येतही सुधारते. पहिले 6 महिने निव्वळ स्तनपानावर असणारी मुले सुदृढ तर असतातच, शिवाय त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे, अतिसाराचे प्रमाण अतिशय कमी असते. योग्य आहाराने आणि आईच्या आत्मविश्वासाने पहिले 6 महिने केवळ स्तनपान करणे काहीही अवघड नाही!जन्मानंतरही बाळाच्या वजनाकडे लक्ष ठेवावे. 6 महिन्यांत साधारण बाळाचे वजन जन्मावेळेसच्या वजनाच्या दुप्पट व्हायला हवे.
सहा ते 12 महिने वरचे अन्न सुरू करणे
अनेक घरांमध्ये विशेषतः शहरांमध्ये बाळाला वरचे अन्न द्यायची घाई केली जाते. आईला नोकरीच्या ठिकाणी रूजू व्हायचे असते, दूध पुरत नाही किंवा बाळाचे पोट भरत नाही अशी शंका येते. रात्री उठून बाळाला स्तनपान द्यायचा कंटाळा येतो, बाळ खूप गुटगुटीत दिसावे असे वाटते म्हणून… अशी बरीच कारणे यामागे असतात. पण 6 महिन्यांत बाळाची पचनशक्ती 6 महिन्यांपूर्वी पुरेशी विकसित झालेली नसते. 6 महिन्यांच्या आधी वरचे अन्न सुरू केल्यास अपचन, अतिसार, जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. 6 महिने ते 12 महिने (1 वर्ष) या काळात सुरुवातीला पातळ, मग काही काळानंतर मऊसर व पचायला सोपे अन्न द्यावे. या काळात सुरुवातीला तांदळाची पेज, डाळीचे पाणी, नाचणीची पेज, फळांचे रस, भाज्यांचे सूप व हे पचायला लागल्यानंतर मऊ खिचडी, फळांचा गर, मऊ शिजवलेल्या भाज्या, अंड्याचा पिवळा भाग, ताजे दही यांचा समावेश करावा. एक वर्षापर्यंतच्या काळात वरचे दूध, गहू, अंड्याचा पांढरा भाग, साखर व मिठाचा वापर पूर्णपणे टाळावा. बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाचे वजन साधारण जन्मावेळेसच्या वजनाच्या तिप्पट व्हायला हवे.
एक ते दोन वर्ष आहारविषयक सवयी
बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर बाळाला घरचे सगळे अन्न देता येते. फक्त खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. या काळात बाहेरील अन्नपदार्थ विशेषतः बिस्किटे, चिप्स, चॉकलेट्स देणे पूर्णपणे टाळावे. साखर, गूळ, मिठाचा वापर अगदी मर्यादित करावा. या काळातच बाळाला आहारविषयक चांगल्या सवयी लावाव्या. जेवणाच्या आधी हात धुणे, आपल्या हाताने खाणे, सगळ्या भाज्या, फळे, डाळी, उसळी खाणे, पाण्याबरोबर न गिळता नीट चावून खाणे, अन्नाला नावे न ठेवणे, जेवणानंतर हात व तोंड धुणे, चुळा भरणे आदी. या काळात लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकतात आणि आरोग्यही टिकवतात!
=======================
The post आहार : बाळाची वाढ पहिली तीन वर्षे appeared first on Dainik Prabhat.