उन्हाळा आला की “अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद! गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.
थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय
शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच. उष्णता कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते. याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
बद्धकोष्ठतेवर गुणकारी
हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, घराबाहेर पडणे बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.
अल्सरवर गुणकारी
शरीरातील अतिउष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं, हा त्रास अनेकांना होतो. उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या अल्सरवर गुणकारी ठरतो. गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठीही उपयुक्त आहे. दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचे सेवन आम्लपित्ताचे नियंत्रण करते, असे आयुर्वेदात म्हटले आहे.
मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी करते
मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरील तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करते, हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आले आहे.
जळजळ कमी होणे
अति उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचे सेवन मदत करते. म्हणजेच त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणे उत्तम!
शांत झोप लागण्यासाठी
चांगली झोप लागायला हवी असेल, तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं. दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी आहे. मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे, रात्री उत्तम झोप लागणं शक्य होतं.
The post आहार : उन्हाळ्यात घामानं जीव कासावीस होतो; गुलकंद खा उन्हाळा बाधणार नाही.. appeared first on Dainik Prabhat.