हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट ऍटॅक हे जगभरातील मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे. मात्र, जवळ-जवळ 45 टक्के हार्ट ऍटॅक हे सायलेन्ट असतात, म्हणजे कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे न जाणविल्याने आपल्या हृदयाला इजा पोहोचली आहे हे लोकांना अनेक आठवड्यांपर्यंत किंवा महिन्यांपर्यंत लक्षात येत नाही. सायलेन्ट मायोकार्डिनल इन्फ्रॅक्शन (एसएमआय) या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या “सायलेन्ट हार्ट ऍटॅक’मध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा अशी काही अनोळखी लक्षणे जाणवतात जी समजून येणे कठीण असते.
यामुळे लोक हृदयाच्या या हानीविषयी अनभिज्ञ राहतात. एसएमआय असल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो, किंचित उद्विग्नता जाणवू शकते. झोपेचे तंत्र बिघडणे किंवा सर्वसाधारणपणे उतारवयात जाणवणाऱ्या समस्या याही एसएमआयशी संबंधित असू शकतात. शिवाय प्रत्यक्ष हृदयाच्या ठिकाणी जाणविणाऱ्या वेदना टोकाच्या नसतात आणि अपचन, पित्त किंवा हृदयातील जळजळीमुळे असे होत असेल असा रुग्णांचा गैरसमज होतो असे प्रमोद नारखेडे, डॉक्टर, सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ एमबीबीएस, डीएनबी, सामान्य औषध यांनी सांगितले.
एसएमआयच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या पुढील काही लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये.
छातीत अस्वस्थता किंवा थोड्या वेळेपुरत्या वेदना होणे आणि काही वेळानंतर पुन्हा तशाच वेदना जाणवणे.
छातीच्या मध्यावर किंवा शरीराच्या वरच्या भागात अस्वस्थ करणारा तणाव, वेदना जाणवणे किंवा छातीत भरल्यासारखे वाटणे
पाठ, मान किंवा जबड्याच्या प्रदेशातील स्नायू हळवे होणे किंवा ताणले जाणे. दोन्ही हात वर उचलण्यास
कष्ट पडणे.
काही व्यक्तींना दीर्घकाळापर्यंत थकवा, फ्लू किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो. ही हार्ट ऍटॅकमध्ये हमखास दिसणाऱ्या लक्षणांसारखी लक्षणे नसल्याने लोक त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करतात.
सायलेन्ट हार्ट ऍटॅक हा तुमच्या हृदयाचे नेहमीच्या हार्ट ऍटॅकइतकेच नुकसान करतो. एसएमआयमुळे हृदयाच्या स्नायूंची हानी होते आणि त्यामुळे तयार होणारे व्रण कार्डिओव्हॅस्क्युलर समस्यांचा धोका
वाढवू शकतात.
सायलेन्ट हार्ट ऍटॅकची बरेचदा इतर समस्यांशी गल्लत केली जाते आणि त्यामुळे आयुष्याच्या पुढील टप्प्यामध्ये हृदयाच्या समस्या जडण्याची किंवा अगदी मृत्यूचीही शक्यता वाढते. दुर्दैवाने, अनेक लोक आपल्या तब्येतीविषयी अज्ञानी असतात आणि आपल्या शरीराला जाणवणाऱ्या काही गंभीर आरोग्य समस्यांची त्यांना कल्पनाही नसते. मात्र कोणत्याही प्रकारचा हार्ट ऍटॅक हा प्राणघातक असू शकतो.
पुढील काही उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य जपता येईल:
नियमित व्यायाम किंवा सक्रिय जीवनशैली
ताणतणाव कमी करण्यासाठी झोप
वजन आटोक्यात ठेवणे
जीवनशैलीत बदल करणे आणि समतोल आहार घेणे
सोडियम, साखर आणि पॅकेजबंद खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे
मद्यपानावर नियंत्रण ठेवणे किंवा ही सवय सोडूनच देणे
The post आरोग्य वार्ता : हार्ट अटॅक लक्षणे ओळखा appeared first on Dainik Prabhat.