सामान्य किंवा थंड वातावरणात असताना देखील तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम येणे सामने बाब आहे. मात्र उन्हाळा नसताना किंवा कोणतेही शारीरिक कष्ट न करताही तुम्हाला जास्त घाम येत असेल तर ही गंभीर बाब असू शकते. तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.अनेकदा आपण या लक्षणांना फार गंभीरतेने घेत नाही. मात्र यामुळे पुढे जाऊन त्रास उद्भवण्याची शक्यता वाढू शकते.ही लक्षणे असणाऱ्या विकाराला वैद्यकीय भाषेत ‘हायपरहायड्रोसिस’ असे संबोधले जाते.
हायपरहायड्रोसिस काय आहे ?
मानवी शरीराच्या मुख्य घामांच्या ग्रंथीवरील रीसेप्टर्स जास्त प्रमाणात उत्तेजीत झाल्याने जास्त घाम येण्याच्या स्थितीला हायपरहायड्रोसिस म्हटले जाते.या विकाराने प्रभावित शरीराचा भाग घाम ग्रंथीच्या स्थानावर आधारित असतो.घामाच्या ग्रंथी या संपूर्ण शरीरावर असतात त्यातही प्रामुख्याने कपाळावर,काखेत, हातापायांच्या तळव्यांवर जास्त असतात.त्यामुळे तिथे घाम अधिक येत असतो.
याची लक्षणे कोणती ?
1) हात, पायावर सतत जास्त घाम येणे.
2) कोणत्याही निश्चित कारणाशिवाय रात्री झोपेत घाम येणे.
3) जास्त घाम येणे यामुळे भावनिक त्रास व सामाजिक माघार.
4) जास्त घामाने तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय निर्माण करणे.
5) हे सामान्यतः किशोरावस्था किंवा वयाच्या 25 व्या वर्षी सुरू होणे.
हायपरहायड्रोसिसचे प्रकार :
1) प्राथमिक हायपरहायड्रोसिस :
ही स्वतः एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे. या प्रकारामध्ये अनुवांशिक घटक परिणाम करीत असतात.
2) माध्यमिक हायपरहायड्रोसिस :
ही अंतर्न्नहीत वैद्यकीय स्थिती असते.हे असामान्य आहे व तुमच्या संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
हायपरहायड्रोसिसची मुख्य कारणे :
1) हार्मोन यंत्रणा व्यवस्थित काम न करणे.
2) घर्मग्रंथी जास्त प्रमाणात स्त्रवणे.
3) अनुवांशिक घटकाचा परिणाम.
4) थायरॉईड, मधुमेह, रजोनिवृत्ती, ताप, अस्वस्थता, हृदयासंबंधित आजार
5) कोणताही आजार नसताना घामग्रंथी प्रमाणापेक्षा जास्त सक्रिय झाल्यामुळे.
निदान व उपचार :
तुमचे डॉक्टर सत्रादरम्यान तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल व लक्षणाबद्दल चौकशी करतील. समस्या कशामुळे होत आहे, हे शोधण्यासाठी काही चाचण्या करणे आवश्यक असते. यामध्ये आयोडीन स्टार्च चाचणी, थर्मो-रेग्युलेटरी घाम चाचणी, थायरॉईड हार्मोन चाचणी, त्वचा चाचणी, रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे इत्यादींचा समावेश होतो.
डॉक्टर तुम्हाला अँटीपर्स्पायरंटस, ग्लाइकोयपायरोलेट, नर्व्ह-ब्लॉकिंग औषधे किंवा अँटी-डिप्रेसन्ट्स असलेल्या क्रीम लिहून देऊ शकतात. प्रारंभिक उपचारांमध्ये प्रामुख्याने अँटीपर्स्पायरंटससह 15-25% ऍल्युमिनियम क्लोराइड हेक्साहायड्रेटचा समावेश असतो. आवश्यक असल्यास, जास्त घाम कमी करण्यासाठी अतिरिक्त बोट्युलिनम इंजेक्शन्स किंवा आयनोटोफोरेसिस प्रशासित केले जातात.
ही काळजी घेणे गरजेचे :
दररोज स्नान करा, स्वच्छता ठेवा, पुरेसे पाणी प्या, सुती कपडे वापरा,मोजे नेहमी बदलत रहा, पाय सुकवून घ्या, नैसर्गिक सहित्याद्वारे बनलेले बूट, मोजे वापरा, अँटीपर्स्पायरंटसचा वापर करा, गरम, मसालेदार व आंबट अन्नपदार्थ खाणे टाळा, घाम येण्यामागील तणाव नियंत्रित करण्यास मदत करा.
The post आरोग्य वार्ता : हायपरहायड्रोसिस म्हणजे नक्की काय ? जाणून घ्या सर्व काही appeared first on Dainik Prabhat.