भारतीय महिलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग, हा स्तनाचा कर्करोग आहे. पाश्चात्य देशांशी तुलना केली तर असं आढळतं की, भारतीय महिलांमध्ये या आजाराचे निदान उशिरा होते.
यामुळे जास्त रुग्ण या आजाराला दगावतात. या निदानातल्या विलंबाबद्दल सहसा डॉक्टर महिलांना दोष देतात. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे खेपा टाकून कंटाळलेल्या महिला डॉक्टरांना दोष देतात. पण ही निदान करण्यात दिरंगाई नेमकी होते का, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोगाचे निदान हे गाठ लहान असताना झाले तर उपचार सोईस्कर होतात. उपचारांना यश येऊन, कॅन्सर परत न उदभवण्याची शक्यता वाढते. गाठ दुखत नसेल, बाकी काही त्रास होत नसेल, तर कर्करोग नसणार हा मोठा गैरसमज आहे . गाठ कशाची आहे हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या केल्यावरच ठरवायला हवे.
कुठे होत असते चूक?
वयाच्या विशी-तिशीमध्येसुद्धा कर्करोग होतो, हे अनेकांना माहित नसतं. चाळिशीच्या अलीकडे वय असताना स्तनाची तक्रार असेल, तर मॅमोग्राफी पेक्षा स्तनाची सोनोग्राफी करणे योग्य ठरते; तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या केल्या पाहिजेत. स्तनात गाठ असेल तर अचूक निदानासाठी गाठीची तिहेरी चाचणी झाली पाहिजे
– यात डॉक्टरांनी केलेले परीक्षण, महिलेच्या वयानुसार उचित असलेल्या मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजीच्या तपासण्या,
सुईची तपासणी किंवा बियॉप्सी, तपासण्या केल्यावर समाधान झाले नाही तर स्तनरोग चिकित्सक किंवा ब्रेस्ट सर्जन चा सल्ला घ्यायला बिचकू नये. रेडिओलॉजी आणी पॅथॉलॉजीच्या रिपोर्टस मध्ये मेळ साधला गेला पाहिजे. या प्रक्रियेत दोन आणि दोन ची बेरीज चार झाल्यासारखी खात्री होत नसेल, तर तिथे निदान साधण्याची प्रक्रिया थांबवता येत नाही. ऋछ-उ ही सुईची तपासणी सोपी आणि स्वस्त असली तरी अनेक वेळा या पद्धतीने अपूर्ण किंवा चुकीचे रिपोर्ट मिळतात. यामुळे निदान पूर्ण करण्यासाठी अनेकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.
या गैरफ़ायद्यामुळेच आम्ही कोर बैयॉप्सी या आधुनिक प्रकारच्या बायोप्सी वापर जास्त करतो- ज्याने करून सहसा शस्त्रक्रिया टाळून निदान करता येते. क्लिनिक मध्ये लोकल ऍनेस्थेशिया खाली 15 मिनिटात बिना टाके वापरता बायॉप्सी होते. सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाने बियॉप्सी केली, तर योग्य जागेतून सॅम्पल घेण्याची अचूकता वाढते. सांगायचं तात्पर्य असं की कर्करोगाच्या निदानाची प्रक्रिया किचकट असू शकते. अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांवर विश्वास ठेऊन उचित मार्गदर्शनाखाली उपचार करून घेण्यात शहाणपण आहे.
गाठ हे कर्करोगाचे लक्षण बऱ्याच लोकांना माहित असते. पण या शिवाय देखील काही लक्षणांबाबत सावध राहिलं पाहिजे. स्तनातून थोडा चिकट स्त्राव होणे सामान्य आहे. पण एका बाजूने जास्त प्रमाणात पाण्यासारखा स्त्राव होणे, रक्ताळलेला स्त्राव होणे हे लक्षण दुर्लक्षित करू नये. स्त्राव निर्माण करणाऱ्या गाठी या सूक्ष्म दुग्धवाहिन्यांचा आत असतात आणि अनेकदा मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी वरती दिसत नाहीत. प्रत्येक वेळी त्या कॅन्सरच्या असतात असे नाही, परंतु याची खात्री करण्यासाठी अनुभवी स्तनरोग चिकित्सकाची मदत घ्यावी.
असामान्य स्त्राव होणे,
स्तनाच्या त्वचेमधे लाली किंवा खडबडीतपणा येणे ,
स्तनाच्या आकारात बदल येणे,
निप्पलचा भाग आत खचणे
ही सर्व देखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
या सर्व गोष्टी सांगण्याचे कारण असे की स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी अजून काही निवारक लस उपलब्ध नाही. परंतु प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. यामुळे महिलांनी आपल्या शारीविषयी जागरूक राहावं, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्तनाच्या नियमित तपासण्या कराव्या आणी स्तनामध्ये जाणवलेल्या अनियमित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
(लेखिका ब्रेस्ट सर्जन, स्तनरोग चिकित्सक आहेत.)
ऑक्टोबर महिना हा दरवर्षी स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांमधील या गंभीर आजाराबाबत अचूक माहिती व्हावी, म्हणून आरोग्य जागरच्या वाचकांसाठी हा खास लेख…
– डॉ. प्रांजली गाडगीळ
The post आरोग्य वार्ता : स्तनकर्करोग निदानास नको विलंब appeared first on Dainik Prabhat.