एखाद्या आजाराच्या डायग्नोसिस मध्ये सोनोग्राफी खूप महत्त्वाची असते. अनेकदा सर्वसामान्य लोकांना गर्भवती स्त्रियांची सोनोग्राफी केली जाते एवढेच माहिती असते. मात्र सोनोग्राफीचा उपयोग तेवढ्यापुरता मर्यादित नाही आपण मानवी शरीराची नखशिखांत सोनोग्राफी करू शकतो. डोके, मेंदू, केस, लिव्हर, पोट, किडनी अशा सर्व अवयवांसाठी सोनोग्राफीचा वापर करता येतो आतड्यांचे अनेक विकार आपल्याला सोनोग्राफी द्वारे तपासून पाहता येतात. बाळाच्या सोनोग्राफीला अँटीनेटल अर्थात प्रसूतीपूर्व सोनोग्राफी असे म्हटले जाते एखादी महिला गरोदर असताना तिच्या गर्भातील बाळ कसे आहे, त्याची प्रकृती ठीक आहे ना किंवा त्याच्यामध्ये काही व्यंग नाही ना हे पाहण्यासाठी सोनोग्राफी चा उपयोग होतो.
सोनोग्राफीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घडीला आपण सोनोग्राफी करतो त्या घडीला शरीरात काय सुरू आहे, त्याची माहिती सोनोग्राफीमध्ये अचूकपणे मिळते. त्यामुळे सोनोग्राफीमधला फरक समजून घेणे आवश्यक आहे. गर्भावस्थेमधील सोनोग्राफी ही निराळी आणि त्या व्यतिरिक्त अन्य आजारांच्या निदानासाठी केली जाणारी सोनोग्राफी निराळी असते. आजच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून हाडांचे आरोग्य किंवा अधिक माहितीसाठी सोनोग्राफी वापरली जाते. हाडांचे अगदी छोट्या-छोटे फ्रॅक्चरसुद्धा सोनोग्राफीमध्ये दिसू शकते जिथे एक्स-रे ला मर्यादा येते.
सोनोग्राफीचा कोणालाही कसलाही त्रास होत नाही. आईला किंवा बाळाला कसलाही त्रास होत नाही. अनेकदा गर्भधारणा गर्भातच होते असे नाही. 95 टक्के वेळा गर्भधारणा गर्भाच्या पिशवीत होत असते. मात्र काहीवेळा ही गर्भधारणा गर्भाशयाच्या पिशवी बाहेर झालेली असू शकते. हे समजण्यासाठी आणि गर्भधारणा झाली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी सोनोग्राफीचा मोठा उपयोग होत असतो. गर्भनलिकेमध्ये जर गर्भधारणा झाली असेल तर ती गर्भधारणा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. मग गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यातील सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. यात बाळामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय, किडनी, मणका या सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात.
अनेकदा मतिमंद मुलांमध्ये आपण नाकाचे हाड नाही किंवा चपटं नाक पाहतो. या नाकाच्या हाडाची वाढ झाली आहे की नाही, हेही सोनोग्राफीमध्ये समजू शकतो याला एमडी स्कॅन असे म्हणतात. गर्भातील बाळाला कोणते अवयव आहेत किंवा नाहीत, याची स्पष्ट कल्पना येत असते. असे व्यंग जर आढळले तर तिसऱ्या महिन्यात गर्भपात करून त्या मातेची सुटका करता येऊ शकते आणि तिचा पुढील गर्भधारणेतील त्रास वाचू शकतो; प्रसंगी जीवही वाचू शकतो.
त्यानंतर येते ती पाचव्या महिन्याची सोनोग्राफी. या ऍडव्हान्सड पद्धतीच्या स्कॅनमध्ये बाळाचा प्रत्येक अवयव बारकाईने पाहिला जातो. यावेळी बाळ 70 ते 80 टक्के तयार झालेलं असतं आणि त्याच्या गर्भातील अवयवांची मापेसुद्धा घेता येतात. मेंदू, हृदय, किडनी किंवा आतड्यांमध्ये काही समस्या असतील, तर त्या समस्या या स्कॅनमध्ये व्यवस्थितपणे समजून येतात. श्वासनलिका आणि अन्ननलिका एकमेकांना जोडलेले असतील, तर तेही या स्कॅन मध्ये समजते.
सहाव्या महिन्यात विशेष तपासणी गर्भाच्या हृदयाची असते. त्यामध्ये त्या बाळाच्या हृदयामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, हेही पाहिले जाते. जे बाळ जन्म झाल्यानंतर फार काळ जगू शकणार नाही, असा अंदाज सोनोग्राफीमध्ये आला तरच अशा बाळाची मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी अर्थात गर्भपात केला जातो. मग सहाव्या आणि सातव्या महिन्यात बाळाच्या एकूण प्रकृतीचा आढावा घेतला जातो. आठव्या महिन्यात बाळ पायाळू आहे का, हेही पाहिले जाते.
गर्भधारणा झाल्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत त्याची वाढ व्यवस्थित होत आहे ना, आणि हे बाळ पुढे सुखरूपपणे जगू शकेल की नाही, हे पाहून खात्री करायची असेल, तर या सर्व सोनोग्राफीच्या चाचण्या करणे अनिवार्य ठरते. कोणत्याही सोनोग्राफीचा बाळावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
प्रेग्नन्सी नसताना महिलेची किंवा एखाद्या पुरुषाची सोनोग्राफी करायची असेल तर त्याचीही विविध कारणे असतात. अनेक फंक्शनल गोष्टींची तपासणीही सोनोग्राफीद्वारे करता येते. डायबिटीसची खात्री ही रक्त तपासून केली जाते. साखरेची पातळी रक्त तपासल्याशिवाय समजत नाही.
मात्र सोनोग्राफीमध्ये डायबिटीसमुळे झालेल्या शरीराच्या आतील अवयवांची हानी समजते. रक्तवाहिन्या, लिव्हर किंवा आतड्यांमध्ये होणारे बदल सोनोग्राफीमध्ये समजत असल्यामुळे डायबिटीसचे दुष्परिणाम हे दिसून येतात. ऍसिडिटीच्या त्रासासाठी एंडोस्कोपी सुचवली जाते. मात्र सोनोग्राफीद्वारेही ऍसिडिटीमुळे झालेल्या आतड्यांची हानी समजू शकते. त्यामुळे सोनोग्राफी आणि एमआरआय चाचण्या एकत्रित केल्यास कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याचा आलेख हा तातडीने समजू शकतो. नव्या तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही रुग्णाच्या आजाराचे अचूक निदान करणे शक्य झाले आहे.
The post आरोग्य वार्ता : सोनोग्राफीचे उपयोग अनेक appeared first on Dainik Prabhat.