बहुतेक सर्व घरात प्रत्येक माणसागणिक सर्वत्र आढळणारी तक्रार म्हणजे कंबरदुखी असे मला वाटते. सकाळी झोपेतून उठल्यावर कंबर ताठल्यासारखे होणे, वाकून केर काढल्यावर कंबर भरून येणे, एखादी भाजीची जड पिशवी उचलून आणल्यावर थोड बसावं वाटणे, बराच वेळ उभे राहून काम करून झाल्यावर पुढच्या कामाआधी जरासं आडवं पडाव वाटणे, गाडीवरून किंवा गाडीतून जास्त वेळ प्रवास झाल्यावर कंबर आणि पाठ दाबून घ्यावी वाटणे, खूप वेळ बसून काम केल्यावर अंग थोड बाजूला मागे फिरवून पाठीची हाडे कडकड मोडल्यावर बरं वाटणे या आणि अशा प्रकारच्या तक्रारी कमरेच्या मणक्यात कमी अधिक प्रमाणात दोष सुरू झाल्याची सूचना देतात, हे लक्षात घ्यायला हवे. याच संदर्भात काही उपयुक्त माहिती आजच्या लेखातून घेऊया.
पाठीच्या मणक्यातील शेवटचे पाच मणके म्हणजे लंबर व्हर्टीब्री अर्थात कमरेचे मणके होत. प्रत्येक मणक्यामध्ये एक नाजूक गादी किंवा डिस्क असते. मेंदूकडून निघणारा मज्जारज्जू या मणक्यामधून जात असतो. तसेच त्याच्या नसांच्या शाखा प्रत्येक दोन मणक्यातून निघून पोटाकडील अंतर्गत अवयव आणि पायाच्या भागाला संवेदनांचा पुरवठा करीत असतात. या सर्व महत्वाच्या भागाला संरक्षण देण्यासाठी, एकसंध ठेवण्यासाठी, पाठीला मजबूती मिळण्यासाठी तसेच शरीराची हालचाल विशिष्ट प्रकारे होण्यासाठी या मणक्याला स्नायू, टेंडन्स आणि लिगामेन्टस् यांचे एक प्रकारचे विशिष्ठ आवरण असते.
यापैकी कोणत्याही एखाद्या भागाचे काम काही कारणांमुळे विस्कळीत झाल्यास त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या तक्रारींद्वारे प्रतिबिंबित जाणवण्यास सुरुवात होते. उदाहरणार्थ, एखादी वस्तू उचलताना किंवा पुढेमागे करताना योग्य खबरदारी न घेता चुकीच्या पद्धतीने केल्यास कमरेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. स्नायू आकुंचन पावतात. बोली भाषेत याला आपण लचक भरणे किंवा स्पाझम येणे असे म्हणतो.
कुठे होत असते चूक?
चुकीच्या हालचालीमध्ये शरीराची मोठ्या प्रमाणात ओढाताण झाल्यास त्याचा परिणाम मणक्यातील गादीवरदेखील होण्याची दाट शक्यता असते. कदाचित गादी जागेवरून सरकूही शकते. ही गादी किती प्रमाणात दुखवली जाते त्यानुसार त्याची लक्षणे व परिणाम शरीरावर दिसून येतात. संधिवात असणाऱ्या काही व्यक्तीनादेखील कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. स्त्रियांच्या बाबतीत गर्भारपणात जसजशी बाळाची नैसर्गिक वाढ होऊ लागते त्यावेळी कमरेचे मणके आणि माकडहाड यांच्यावर ताण येऊन कमरेचे दुखणे सुरू होण्याची शक्यता अधिक असते. बाळंतपणामध्ये आणि त्यानंतर देखील योग्य काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा भविष्यात कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो हेही ध्यानात घ्यायला हवे.
The post आरोग्य वार्ता : कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी करा हे ‘योगासन’ appeared first on Dainik Prabhat.