गेल्या एका दशकापासून मधुमेहाचे प्रमाण 7.1% वरून 8.9% इतकं उसळी मारून का बर वाढलं असेल?यामागे मधुमेहाचं वाळवीशी असलेलं साधर्म्य कारणीभूत आहे.म्हणजे आतून पार पोखरून पोकळ करेपर्यंत त्यांचं अस्तित्व जाणवून येत नाही. दृश्य परिणाम दहा वर्षांपर्यंत कळू लागतात. मधुमेह आपल्या रक्तवाहिन्यांना कमकुवत करत असतो.
पायाच्या नखांपासून डोक्यांवरच्या केसांपर्यंत हे रक्तवाहिन्यांचं जाळं शुद्ध हवा,संप्रेरक इ.पुरवण्यासाठी गरजेचं असतं.जसजश्या रक्तवाहिन्या बंद पडू लागतात, मग डोळ्यांचा पडदा ,किडनी ,सर्व नसा, हृदय, मेंदू असे अवयव संप पुकारू लागतात. आई-वडिलांकडून आपल्याला जशी मालमत्ता वारसा हक्काने येते तसं मधुमेह तर आला नाही ना? हे स्क्रीनिंग करून वेळीच पाहिलं तर बरेच अवयव बाद होण्यापासून वाचू शकतात. दुसरा हातातला उपाय म्हणजे, सकस खाणं आणि व्यायाम यांनी वजन आटोक्यात ठेवणं.
कारण जसं दुसरीतल्या मुलाला दहावीचं दप्तर पेलवणार नाही तसंच आपले संप्रेरक नको इतकं वजन वाढवलं तर पुरेच पडत नाहीत. त्यामुळे थायरॉईडचीही कमतरता वाटू लागते. रक्तदाब वाढू लागतो. या सगळ्यात भर घालायला मानसिक ताण त्याचाही वाटा उचलतो. स्ट्रेसमुळे रक्तातलं साखरेचे प्रमाण उच्च पातळीवर राहतं. तसेच इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवरही स्ट्रेस हार्मोन म्हणजे सड्रीनलिन, कॉर्टिसोल हे आघात करत असतात. वाढलेल्या वजनामुळे असलेल्या इन्सुलिनलाही पेशी दाद देत नाहीत( इन्सुलिन रेझिस्टंस). रक्तातली वाढलेली साखर आपल्याला डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराकडेही घेऊन जाते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून एक दुष्टचक्र तयार होतं. त्याचा भेद करणं फक्त प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात आहे.’
ताण’ हा येण्याची नव्हे तर घेण्याची गोष्ट आहे. एकदा आपण आतूनच निरोगी जगण्याचं ठरवलं तर बाह्य गोष्टी फारसा त्रास देऊ शकणार नाहीत.आपला समाधानाचा परिघ ओळखून नकाराचा अधिकार बाळगला तर जगणं सुकर होऊन जातं. मग हा नकार जास्त खाण्याला असेल ,जास्त काम स्वीकारण्याला असेल वा जास्त स्ट्रेस घेण्यालाही असेल! शास्त्र प्रगत होतंय हे खरंच. पण काही प्रश्न माणसांनीच निर्माण करून ठेवलेत आणि आता त्यांचं उत्तर शोधल्यावर आपण आपली पाठ थोपटून घेतोय.
पिढी जात सात्विक अन्न डावलून जंक फुडच्या आहारी जायचं आणि मग नवनवे डाएटचे उपाय शोधत फिरायचं, हे म्हणजे ‘काखेत कळसा गावाला वळसा’ असंच झालं. आयुर्वेदाची महती अमेरिकेने सांगितल्यावर कळते का आपल्याला? सूर्यनमस्कार, योगासनं याचही तेच झालंय. पूर्वी आपण भारतीय हे सर्व करतच होतो. मोहेंजोदडोच्या उत्खननासारखं आता आपलाच खजिना आपल्याला सापडतोय. हेही नसे थोडके! भारतामध्ये 25 मिलियन प्री-डायबेटिक म्हणजे ज्यांना मधुमेहाचा पुढे जाऊन धोका आहे असे लोकं आहेत. योग्य उपायांनी म्हणजे,योग्य जीवनशैली जसे की- व्यायाम, संतुलित आहार,चांगले मानसिक आरोग्य यांनी आपण यांना तर वाचू शकतो. मधुमेहाच्या विळख्यातून पुढची पिढी तर सोडू शकतो?
The post आरोग्य वार्ता : आता गरज आत्मपरीक्षणाची…! appeared first on Dainik Prabhat.