आपल्या शरीरातील 72000 नाड्यांची शुद्धी केवळ या अनुलोम-विलोम प्राणायामाद्वारे होत असते. इतका महत्त्वाचा शरीरशुद्ध करणारा हा प्राणायाम प्रकार प्रत्येकाने रोज नियमित केलाच पाहिजे, असे योगशास्त्र म्हणते. या प्राणायामाद्वारे नाडी शुद्धी होते. म्हणजे याचा सराव जर योग्य असेल तर प्राणायामाच्या इतर अवघड प्रक्रिया सुलभपणे करता येतात.
नाकपुड्या बंद करण्याची रीत
प्रथम प्रणव मुद्रा बांधावी; म्हणजेच अंगठ्याशेजारील दोन्ही बोटे-तर्जनी व मध्यमा मुडपून करंगळी व अनामिका उभी ठेवावी. आता उजवा हात कोपरात दुमडून छातीजवळ न्यावा. उजव्या हाताच्या अंगठ्याने पिंगला नाडी व अनामिका व मध्यमेने डावी नाकपुडी बंद करावी.
पद्धती
इडा नाडी किंवा वाम स्वर हा सोम, चंद्र व शांतीचे प्रतीक आहे. म्हणून नाडी शुद्धी प्राणायाम करताना डाव्या नाकपुडीने सुरुवात करावी. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी. अंगठ्याबरोबर नाकाच्या हाडाखाली आपण उजव्या हाताने बंद करून पूर्ण श्वास बाहेर टाकावा. तीव्र गतीने पूर्ण शक्तीने श्वास आत घेऊन बाहेर टाकावा. आपल्या शारीरिक ताकदीनुसार श्वासोच्छ्वासाबरोबर गती हळू, सावकाश व जोरात करावी. तीव्र गतीने पूरक, रेचक, करावे. यामुळे श्वासाचा जोरात आवाज होतो. श्वास पूर्ण बाहेर सोडल्यावर आता उजव्या नाकपुडीने श्वास भरभरून घ्यावा. अनुक्रमे डाव्या उजव्या नाकपुड्या एकदा एक याप्रमाणे नाकपुडी बंद करून श्वास घेत सोडत राहावे. डावीने घेऊन उजवीने सोडून परत उजवीने घेऊन डावीने सोडावा. डावीने घेताच एक आवर्तन पूर्ण होईल. ही क्रिया लागोपाठ एक मिनीट करावी. जर थकल्यासारखे वाटले तर थोडीशी विश्रांती घेऊन, मग परत अनुलोम-विलोम करावे. हळूहळू 1 मिनिटापासून 10 मिनिटांपर्यंत हा प्राणायाम हळूहळू सरावाने वाढविता येतो.
आकडे मोजत अनुलोम विलोम
नाडी शुद्धी किंवा अनुलोम विलोम करताना जेवढा वेळ श्वास घ्यायला लागेल, त्याच्या दुप्पट वेळ हा श्वास सोडण्यास लागला पाहिजे. नाकपुडीने जितका श्वास घेता येईल तितका तो घ्यावा. नंतर उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करावी. जालंधर बंध बांधावा. हनुवटी छातीला चिकटवावी. आता श्वास रोखून धरावा. कुंभक करावे. पण या कुंभकाचा कालावधी एकदम न वाढवता रोजच्या सरावाने आपोआप वाढतो. आपण उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद केली आहे ही क्रिया करत असताना लगेचच डाव्या नाकपुडीने आवाज न करता श्वास सावकाश बाहेर सोडावा.
सुरुवातीला योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यभेदन प्राणायाम करावा. पहिल्यांदा फक्त जालंधर बंध बांधूनच सूर्यभेदन प्राणायाम शिकविला जातो, पण नंतर मात्र तीनही बंध बांधून कुंभकाचा कालावधी वाढवून कुंभकात असतानाच बंध तपासून शेवटी जालंधरबंध सोडावा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. प्रथम मूल, मग उडियान आणि शेवटी जालंधरबंध सोडावा. सूर्यभेदन प्राणायाम हा भस्त्रिका प्राणायामानंतर केला जातो. पहिल्यांदा याची प्रॅक्टिस एकदम करू नये. हा प्राणायाम पिंगला नाडी जागृत करत असतो. हा प्राणायाम करताना उष्णता ही जास्त प्रमाणात निर्माण होते म्हणून उन्हाळ्यात हा प्राणायाम करण्याचे टाळावे. जर व्यवस्थित शिकले तर सूर्यभेदन 15 मिनिटे सहज करता येण्यासारखा प्राणायाम आहे. या प्राणायामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
याचे फायदे थोडक्यात असे
अशक्त यकृत सशक्त बनते.
यकृतात योग्यप्रमाणात पित्तरस स्रवतो.
सर्व इच्छा पूर्ण करणारी कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. पण त्यासाठी साधना आवश्यक आहे.
सूर्यभेदन प्राणायामामुळे जठाराग्नी प्रदिप्त होऊन भूक चांगली लागते.
अशक्त व्यक्तींनी हा प्राणायाम जरूर करावा.
ज्यांना संधिवात झाला असेल त्यांनी सूर्यभेदन प्राणायाम नियमित करणे आवश्यक आहे.
सूर्यभेदन
कोडासारखे गंभीर विकार, जे काहीजणांना जन्मजात असतात. ते बरे करतो. हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
सूर्यभेदन प्राणायामाचा सतत सराव केल्याने शारीरिक तसेच मानसिक शांती लाभते.
वातापासून उत्पन्न होणारे अनेक विकार सूर्यभेदन प्राणायाम बरे करते.
काही वेळा वायुप्रकोपामुळे आंतड्यात रोगजंतू निर्माण होतात जे अनेक रोग निमंत्रित करतात. हे रोग नियमित सूर्यभेदनामुळे नाहीसे होतात.
सूर्यभेदन रक्तदोष घालवते.
निरोगी व्यक्तीने रोज हा प्राणायाम केला तरी चालू शकत,े पण शक्यतो सूर्यभेदन हे थंडीत अधिक लाभदायक आहे. कारण ते शरीरात उष्णता निर्माण करते. तसा सूर्यभेदन प्राणायाम हा प्रकार सर्वसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय नाही, पण योगशास्त्रात मात्र त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे व सखोल अभ्यासक तो करतातच. मात्र आपण करताना तो योग्य अशा योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे इष्ट ठरते. डाव्या नाकपुडीने श्वास सावकाश घ्यावा आणि तो उजव्या नाकपुडीने सोडावा. सोडताना जेवढा वेळ श्वास घ्यायला लागेल त्याच्या दुप्पट वेळ सोडायला लावावा. अशा पद्धतीने डावीने घेऊन उजवीने सोडताना लगेचच उजवीने घेऊन त्याच्या दुप्पट वेळ डावीने सोडताना लावावा. म्हणजेच चार आकड्याने घेऊन आठ आकड्यात उजवीने पूर्णपणे श्वास सावकाश सोडावा लगेचच तिथून चार आकड्यात उजवीने घेऊन आठ आकड्यांमध्ये सावकाश श्वास डावीने सोडावा.