हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. करायला सोपे असे हे “पादस्पर्शासन’ नावाने ओळखले जाते. हे आसन विशेषतः प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक जडणघडण करण्यासाठी केले जाते. या आसनात पाय, मांड्या, हात यांना बैठक स्थितीत आसन स्थिती केल्यामुळे चांगल्याप्रकारे ताण येतो व त्यांचे कार्य सुधरायला मदत होते. कंबर वाकवल्यामुळे कमरेचे स्नायू मजबूत होतात. हाता- पायांच्या सांध्याची हालचाल झाल्यामुळे त्यांना मजबुती येते. वातविकार बरे होतात. पोट कमी होण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. पचनक्रिया सुधारते. आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. शोैचाची तक्रार दूर होते.
हे आसन असे करावे -प्रथम बैठक स्थिती घ्यावी. मग दोन्ही पाय दोन्ही बाजूंला रुंद पसरावेत. दोन्ही पायांमध्ये नव्वद अंशांचा कोन करावा. पाय ताठ गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवावेत. श्वसन संथ ठेवावे आणि सावकाश नियमित ठेवावे. डावा हात मागे पाठीवर ठेवावा किंवा कंबरेभोवती लपेटावा, उजव्या हाताची मुठ करावी आणि कंबर पुढे वाकवत उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून दळण दळल्यासारखा हात डावीकडे नेऊन, डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करावा. याच वेळी आता कंबर मागे नेत नेत उजव्या हाताची मूठ बेंबीला स्पर्श करून पुन्हा उजव्या पायाच्या अंगठ्याकडे न्यावी. या वेळी उजव्या हाताची हालचाल गोलाकार होईल आणि कंबर उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरेल. हा एक फेरा झाला. अशा प्रकारे असे प्रत्येक बोटाला स्पर्श करत करत कमीत कमी पाच फेरे घ्यावे. आता याच पद्धतीने डाव्या हाताने डावीकडून उजवीकडे प्रत्येक बोटाला स्पर्श करत करत कमीत कमी पाच फेरे घ्यावेत.डावीकडूनही हा एक फेरा पूर्ण झाला.
असे पाची बोटांना सर्श करत करत कमीत कमी पाच फेरे घ्यावे. अशा प्रकारे पादस्पर्शासन केल्याने पोटाला चांगल्याप्रकारे व्यायाम होतो आणि पोटातील पाचकग्रंथी चांगल्याप्रमाणात स्त्रवू लागतात.पादस्पर्शासनामुळे हातापायाच्या स्नायूंना बळकटी तर येतेच पण अतिरिक्त चरबी जर पोटावर साठली असेल तर ती पण घटण्यास मदत होते. पादस्पर्शासन हे रोज नियमित करावे, विशेषतः स्त्रीयांनी आपले पोट कमी करण्यासाठी हे आसन जरूर करावे.
मासिक पाळीच्या काळात मात्र कंबरेवर आणि पोटावर दाब देणारे पादस्पर्शासन अजिबात करू नये. मणक्याची झीज न होता दोन मणक्यामधील जागा म्हणजेच गॅप पडली असल्यास ती कमी करण्यासही पादस्पर्शासन उपयोगी पडते. मूठ आवळल्याने बोटांची अग्र पेरे दाबली जातात त्यामुळे ऍक्युप्रेशर पॉईंटस दाबले जाऊन एकूणच शरीराचे कार्य सुरळीत चालू रहाते म्हणूनच हे सोपे आसन रोज करावे. सुरूवातीला या आसनाचा कालावधी 30 सेकंद आहे परंतुं नंतर सरावाने हे आसन दोन मिनिटांपर्यंत टिकवता येते. काहीजण दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला स्पर्श करत हे आसन एकदा डाव्या बाजूने, एकदा उजव्या बाजूने करतात. ज्येष्ठांनी पायाचा अंगठा पकडण्याचा अट्टाहास करू नये. जेवढे हात लांब जातील तेवढेच न्यावेत.
===================