आमवाताने त्रस्त आहात ?
May 3rd, 10:04amMay 3rd, 2:10pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
प्रत्येकाने आपल्या जेवणाच्या सवयी एकदा तपासून घ्याव्यात. या जेवणाच्या सवयीवरच आमवात अवलंबून असतो. जेवण झाल्यावर तीन तासांची पोटाला विश्रांती हवी म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होते, पण तसे होत नाही. त्यामुळे आमवात जडतो. अन्न पक्व स्थितीत आंत्राशयातून व पच्चमानाशयातून पचनाचे पुरेसे संस्कार न होता पुढे ढकलले जाते. आहाररसाबरोबर शरीरात फिरणारे रक्तही आमस्वरूपी बनते. पोट साफ नसणे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
जडान्न, मेवामिठाई यांचा अतिरेक करणे, दीर्घकाळ बारिक ताप येत राहणे, संचारी वेदना म्हणजे शरीराच्या निरनिराळ्या भागात निरनिराळ्या वेळी दुखणे, सुरुवातीच्या अवस्थेत सांध्याव्यतिरिक्त भाग जखडला जाणे, सांध्यांचा आवाज येईलच असे नाही, परसाकडे चिकट होणे, साफ न होणे, भूक मंदावणे, जीभ चिकट होणे, आळस येणे, उत्साह नसणे, शरीराच्या सर्व भागांवर शोथ म्हणजे सूज, गरम पाण्याने शेकावेसे वाटणे, तेल चोळल्याने काही वेळा दुखणे वाढणे, सकाळी उठताना शरीर आंबल्यासारखे वाटणे.
आमवातावर आयुर्वेदिक उपचार
सिंहनाद गुग्गुळ (कमी औषधी घटकांचा), लाक्षादी गुग्गुळ व आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळ्या सकाळ-सायंकाळ बारीक करून गरम पाण्याबरोबर घेणे.
वेदना खूप झाल्यास वातगजांकुश किंवा लवंगदी गुग्गुळ याचा वापर करावा.
जेवणानंतर सौभाग्य सुंठ अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावी.
एरंडपाक एक ते दोन चमचे सकाळी घ्यावा.
गरम पाण्यात मीठ टाकून टॉवेल किंवा फडके बुडवून दुखणारा भाग शेकावा.
जेवणानंतर महारास्नादी क्वाथ चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.
पिण्याच्या पाण्यात सुंठचुर्ण मिसळून ते प्यावे.
पोळी करावयाच्या कणकेत एका पोळीला एक चमचा, या हिशेबाने एरंडेल तेल मोहन म्हणून घालावे.
ज्या रुग्णाला कोणताच गुग्गुळ चालत नाही, अशा रुग्णाने सुंठ, एरंडेल ही औषधे वैद्याच्या सल्ल्याने पोटात घ्यावीत.
ज्यांना लेपामुळे पुरळ वा इतर त्रास होतो, त्यांनी वडाची किंवा एरंडाची पाने दुखऱ्या भागावर बांधावीत.
एरंडामुळीचा काढा चहासारखा सकाळी व सायंकाळी करून प्यावा.
अंथररूण सदैव उबदार असावे.
जखडलेला, सुजेचा व दुखणारा भाग यावर रात्री गुग्गुळ, सुंठ, पुनर्नवा, हिरडा, आंबेहळद, रक्तरोडा, कोंबडनखी, वेखंड अशा औषधांचा लेप, दाट व गरम लावावा. रात्रभर ठेवून सकाळी काढावा.
हातापायांना मुंग्या येत असल्यास वेखंड चूर्ण चोळावे. तात्पुरत्या मुंग्या थांबतात.
ज्यांना बिब्वा त्रास देणार नाही, अशांनी पोटातून दूध व पाण्याबरोबर उकळलेल्या बिब्व्याचा काढा घ्यावा.
संपूर्ण अंगाला निरगुडी, एरंड, कडूनिंब यांच्या पानांच्या काढयाचा सर्वांगी स्वेद घ्यावा.
गुडघे, कंबर जखडली आल्यास अवगाह-टबबाथ उपयोगी पडतो.