जपानी कंपनी एयरविन्सने (Airwins) उडत्या बाईकचे स्वप्न साकार केले आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेली बाइक फॅन्टसी आता खरी होत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात सुरू असलेल्या ऑटो शोमध्ये त्याचे नुकतेच लॉन्चिंग झाले. जपानच्या या उडत्या बाईकला ‘एक्स टुरिस्मो’ (X Turismo) असे नाव देण्यात आले आहे. याला ‘हॉवरबाईक’ असेही म्हणतात.
बाईकच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, ही 40 मिनिटे ताशी 100 किलोमीटर वेगाने उडू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे सहा कोटी रुपयांपर्यंत असेल.
‘एक्स टुरिस्मो’ बाईकची खासियत म्हणजे तिचा शानदार लुक. याला स्पोर्ट्स बाईकसारखा लूक देण्यात आला आहे पण ड्रायव्हरसाठी ती खूपच आरामदायी असेल. सध्याचे मॉडेल पेट्रोलवर चालणारे आहे.
एयरविन्स कंपनी ही बाईक जपानमध्ये विकत असून केवळ या मॉडेलपुरती मर्यादित राहण्याचा कंपनीचा मानस नाही, तर भविष्यात आणखी छोट्या बाइक्सही समोर आणल्या जाऊ शकतात. कंपनीच्या संस्थापकाच्या म्हणण्यानुसार, ते सध्या दुसर्या प्रोजेक्टवर काम करत आहेत, ज्यामध्ये आणखी एक लहान इलेक्ट्रिक मॉडेल तयार केले जात आहे. हा विशिष्ट प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागू शकतात आणि कंपनीचे नवीन उत्पादन 2025 पर्यंत येणे अपेक्षित आहे. यासोबतच नवीन मॉडेल सध्याच्या मॉडेलपेक्षा स्वस्तही असू शकते.
बाइक चालवल्यानंतर, डेट्रॉईट ऑटो शोचे सह-अध्यक्ष म्हणाले की हॉवरबाईक उत्कृष्ट आहे आणि खूप आरामदायक देखील आहे. ते चालवताना त्यांना वाटले की ही बाईक थेट सायन्स फिक्शन चित्रपटांमधूनच आणली आहे. त्यांनी सांगितले की ते एखाद्या 15 वर्षांच्या मुलासारखे एन्जॉय करत होते.