पुणे – मंगलमूर्ती, विघ्नहर्ता, गजानन…अशी अनेक नावे असणारा आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा यंदा मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी येणार आहे. यंदा चतुर्थी तिथी प्रारंभ: 18 सप्टेंबर 2023 रोजी 12 वाजून 39 मिनिटे ते चतुर्थी तिथी समाप्ती: 19 सप्टेंबर 2023 रोजी 1 वाजून 44 मिनिटापर्यंत आहे. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी केवळ श्रीगणेशाचे नाव घेतल्यास ते कार्य सफल मानले जाते.
मान्यतेनुसार, श्रीगणेशाची मूर्ती पूर्ण विधीपूर्वक स्थापित केल्याने अधिक आशीर्वाद प्राप्त होतात. घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जर तुम्हालाही तुमच्या घरात गणपतीची मूर्ती बसवायची असेल परंतु पूजा करण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर आम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करतो. खाली दिलेल्या सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही खऱ्या मनाने श्रीगणेशाची आराधना तुमच्या घरात करू शकता….
अशी करा गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा :
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची पूजा शक्यतो सकाळच्या वेळेसच केली जाते. सर्व प्रथम, आंघोळ करा आणि नवीन/स्वच्छ कपडे घाला. गणपती बाप्पाची मूर्ती कापडाने झाकून ढोल-ताशांच्या गजरात घरी आणावी. दारात मूर्तीचे पाय धुऊन अक्षता अर्पण करून प्रवेश करावा. त्यानंतर पाटावर मूर्तीची स्थापना केली जाते.
स्थापनेपूर्वी व्यासपीठावर (पाटावर) पाणी शिंपडून ते स्वच्छ करा आणि लाल कपडा पसरवा. आता अक्षत टाकून श्रीगणेशाची मूर्ती बसवा. श्री गणेशाला गंगाजलाने अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर दुर्वा, अक्षत, फुले, हार, तिलक इत्यादी एक-एक करून अर्पण करा. धूप दिवा लावा आणि गणेशाच्या मूर्तीजवळ ठेवा. त्यानंतर गणेशजींना आवडते मोदक किंवा लाडू अर्पण करा. पूजेसाठी तुम्ही गणपतीच्या मंत्रांचाही जप करू शकता. यासाठी तुम्ही पूजा पुस्तक किंवा इंटरनेटची मदत नक्कीच घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
पूजा झाल्यानंतर शेवटी श्रीगणरायाची आरती करा आणि घरी बनवलेल्या पक्वान्नाचा विशेषत: मोदकांचा नैवेद्य देवाला दाखवा. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. रोज गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गणेशोत्सव दहा दिवस चालतो. पूजा, आरती, नैवेद्य, भजन असे आनंदी आणि मंगलमय वातावरण असते. या आनंदात कुटुंबातील लहान मोठे तसेच समाजातील सर्व लोक सहभागी होतात.
गणरायाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य :
श्री गणेश मूर्ती
लाकडी स्टूल (पाठ / आसन)
स्टूलवर ठेवण्यासाठी लाल कापड
गणपतीला अर्पण करण्यासाठी पंचामृत
लाल चंदन
विड्याचे पान
कलश
गंगा जल
जानवे
जपमाळ
पाच प्रकारची फळे (सफरचंद, केळी, चिक्कू, संत्री, इत्यादी…)
मोदक किंवा लाडू (प्रसादासाठी)
नारळ
सुटे पैसे (पूजेसाठी)
दूब/दुर्वा
सुगंधी अत्तर
लवंगा
सुपारी
वेलची
हिरवी मूग
पंचमेवा
तुपाचा दिवा
अगरबत्ती
कापूर
The post आता घरच्या घरी करा ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना’; पाहा, शुभ मुहूर्त आणि पूजेची सर्व तयारी… appeared first on Dainik Prabhat.