गुगलच्या ऍप स्टोअरवर असलेल्या ऍपमध्ये एक नवीन मालवेअर आढळून आला आहे. एका सुरक्षा संशोधकाच्या म्हणण्यानुसार, गुगल प्ले स्टोअरवरील आठ अँड्रॉइड ऍप्समध्ये एक नवीन मालवेअर आढळला आहे, जो वापरकर्त्यांना त्यांच्या नकळत प्रीमियम सेवांचे सबस्क्रिप्शन देत होता. ‘ऑटोलायकोस’ (Autolycos) असे या मालवेअरचे नाव आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहेत. मात्र, आता हे आठ ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत.
– मालवेअर वैयक्तिक डेटा चोरतो
सायबर सिक्युरिटी फर्म अवेनाचे (Avena) सुरक्षा संशोधक मॅक्सिम इंग्राओ यांनी ट्विटरच्या माध्यमातून या मालवेअरची माहिती दिली आहे. ऑटोलायकोस नावाच्या मालवेअरचा शोध लागला असून गुगलच्या ऍप स्टोअरच्या जवळपास आठ ऍप्समध्ये हा मालवेअर असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. ऑटोलायकोस वापरकर्त्यांचे वैयक्तिक तपशील आणि डेटा चोरतो, अगदी हा मालवेअर तुमच्या नकळत तुमचा एसएमएस वाचत राहतो. ऑटोलायकोस रिमोट ब्राउझरवर URL कार्यान्वित करते आणि WebView शिवाय HTTP विनंती मंजूर करतो.
– हे आहेत ‘ते’ आठ ऍप्स
संशोधकाच्या म्हणण्यानुसार, हा मालवेअर गुगल प्ले स्टोरच्या Creative 3D Launcher, Gif Emoji Keyboard, Vlog Star Video Editor, Wow Beauty Camera, Freeglow Camera आणि Coco Camera v1.1 सारख्या ऍप्समध्ये आढळला आहे. प्ले स्टोअरवरून 30 लाखांहून अधिक लोकांनी हे ऍप्स डाउनलोड केले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये यापैकी कोणतेही ऍप असल्यास ते त्वरित अनइन्स्टॉल करा. मात्र, आता हे ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत.
– मालवेअर ऍप्स कसे काढायचे ?
तुमच्या मोबाईलमध्येही हे ऍप्स असतील तर हे ऍप काढून टाकण्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर ऍप विभागात जा. तेथे, ऍप सूची पूर्णपणे तपासा आणि अनइंस्टॉल करा किंवा माहिती नसलेले ऍप त्वरित थांबवा. यानंतर, फाइल मॅनेजरकडे जा आणि त्या ऍपशी संबंधित सर्व फाइल्स हटवा.