लंडन : जगभरातील अनेक लोकांना स्थूलपणाची समस्या भेडसावत आहे आपले वजन कमी कसे करायचे याची चिंता जगातील अनेक लोकांना लागली असतानाच आता इंग्लंडमधील काही शास्त्रज्ञांनी यावर एक उपाय शोधला आहे. केवळ एका इंजेक्शनद्वारे स्थूलपणावर मात करता येणे शक्य होणार आहे. दर आठवड्याला एक इंजेक्शन घेऊन ही उपचार पद्धती राबवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगभरातील 70 कोटी लोकांना स्थूलपणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे अनुषंगिक आजार होतात त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अनेक लोक आपल्या वजन कमी करण्याकडे आता लक्ष देत आहेत.
अनेक उपाययोजना करूनही वजन कमी होत नाही असा अनुभव अनेकांना येतो. पण आता ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या इंजेक्शनमुळे सहजपणे स्थूलपणावर मात करता येणार आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीप्रमाणे या इंजेक्शनचे नाव सेमाग्लुटाईड असे असून हे इंजेक्शन टोचल्यानंतर संबंधित व्यक्तीची भूक काही प्रमाणात कमी होते.
आहाराचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपोआपच वजनावर नियंत्रण होते सेमाग्लुटाईड तसं नवीन औषध नाही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्यावर या औषधाचा वापर केला जातो पण आता स्थूलपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथमच या इंजेक्शनचा वापर करण्यात येणार आहे.
ब्रिटनमधील या संशोधकांनी तब्बल दोन हजार लोकांवर प्रयोग करून संशोधनाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर हे इंजेक्शन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लेख न्यू जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झाला असून ब्रिटनच्या ड्रग कंट्रोल संस्थेने इंजेक्शनला परवानगी दिली आहे. या इंजेक्शनचे चाचणी सुरू असताना दोन हजार लोकांपैकी 32 टक्के लोकांना आपले वजन तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाल्याचा अनुभव आला.
चाचणी मध्ये सहभागी झालेल्या बहुतेकांचे वजन 15 किलोने कमी झाल्याचे निष्कर्ष समोर आले. त्यामुळे आता हे इंजेक्शन लवकरच नियमितपणे वापरात येणार आहे.