मुलांना पौष्टिक जेवणासह मधल्या वेळेत पौष्टिक काय बरं द्यावं, हा नेहमीचा प्रश्न असतो. त्यावर डब्यात देण्यासारखे काय देता येईल?
राजमा टिक्की- उकडलेला राजमा + उकडलेला बटाटा + आले लसून मिरची पेस्ट मीठ, हे सर्व एकत्र मळावे. त्याची टिक्की करावी. रव्यावर घोळवावी, शालो फ्राय करावी. यातून प्रथिने कॅल्शियम मिळेल. डब्यातही देता येईल व पोटही भरेल. पोळी बरोबरही खाता येईल.
ग्रीन रोल – उकडलेला हिरवा मुग + थोडा पालक चिरून +थोडा उकडलेला बटाटा + आले लसून मिरची पेस्ट मीठ, हे सर्व एकत्र मळावे. त्याची टिक्की किवा लांबट रोल करावा. रव्या वर घोळवावा, शालो फ्राय करावा. हे देखील पोळीबरोबर डब्यात देता येईल किंवा नुसते खाल्ले तरी पौष्टिक व पोटभरीचे आहे.
हे नवे दोन पदार्थ आहेत. पण आपले वेगवेगळ्या प्रकारचे पराठे हे ही अतिशय उत्तम आहेत डब्यात देण्यासाठी. स्टफ करायला कोणतेही कडधान्य वापरून केलेली कोरडी उसळ घेऊ शकता.
खजूर गुळ शेंगदाण्याचे कुट हे मिश्रण वापरून त्याचा गोड पराठा देऊ शकता. नाचणी लाडू, मिश्र पिठाचा लाडू, दाण्याचा लाडू, खजूर, मनुका, सुके अंजीर, ताजी फळे हे अगदी थोडा वेळ असताना किंवा लगेच शिकवणीला जायचे आहे व मुल बसमध्ये आहे तर तिथेही हे पटकन खाता येईल.
पालक पुरी, तिखट मीठाच्या घरी केलेल्या पुऱ्या, लाल भोपळ्याच्या घारग्या म्हणजे गोड पुरी हे देखील पटकन खाण्यासारखे आहे. अगदी रोज तळलेले शक्यतो टाळावे. परंतु बदल म्हणून एक तळीव पदार्थ डब्यात देऊ शकता. कणिकेचे मोदक करतो तसे तिखट मोदक करावेत. त्यात सारणासाठी कोरडी हिरव्या मुगाची उसळ+ परतून घेतलेला खिसलेला कोबी + परतून घेतलेले खिसलेले गाजर, हे तिन्ही एकत्र करून हे सारण कणकेच्या पारित भरून त्याचा मोदक बनवावा व तो तळावा. घरी गरम छान लागतील पण डब्यातही कधीतरी मज्जा वाटेल व एक हा मोदक आणि खजूर व त्याबरोबर नाचणीचा लाडू खाल्ला की जेवण झाल्यासारखे पोट पौष्टिक पदार्थाने भरेल.
मुलांना “बाहेरचे खाऊ नका,’ असे सांगताना यांना घरातले खाऊ मनापासून आवडावेत यासाठी (थोडे कष्ट करून) जर पौष्टिक पदार्थ बनवले तर त्यांच्यामधील स्थुलत्वाचे प्रमाण कमी होईल. बाहेरच्या चिप्सपेक्षा घरी नाचणीचे पापड तळून देऊ शकता. मुगाचे वडे, घरातली भाज्यांची भजी असा खाऊ आपणच मुलांना घरी दिला तर त्यांना बाहेर खाण्याची सवय लागणार नाही.
सध्या भेडसावणारा मुलांच्या स्थुलात्वाचा प्रश्न कसा सोडवायचा, हे अनेक पालकांना समजत नाही. कारण त्यांना खायला न देऊन वजन कमी होणार नाही. अनेक मुलांना आवडत नाही म्हणून घरी केलेल्या पालेभाज्या किंवा उसळी दिल्या जात नाहीत. सतत बटाटा भाजी आणि नुसताच वरण भात दिला जातो. वरण-भात पौष्टिक व सोपा असल्याने हा पर्याय रात्रीचे जेवण बनतो.
परंतु तसे न करता सर्व भाज्या, कोशिंबीरी, उसळी खायची मुलांना पहिल्यापासून सवय लावावी. मुलांची भाजी वेगळी, असं न करत एकच स्वैपाक सर्वांना असं केलं तर सर्व गोष्टी मुलांना खायची सवय लागेल. मुलांना वेगवेगळं खायची सवय लावली की, आयुष्यभर त्याचा त्यांना फायदाच होईल. चला तर मग मस्त खमंग पण पौष्टिक वेगवेगळे पदार्थ बनवू.