
अन्नाची नासाडी टाळा
July 25th, 2:38pmJuly 25th, 2:38pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आपण लहान-सहान गोष्टींची अगदी घरापासूनही सुरुवात करू शकतो. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न वाया न घालवणे. यासाठी एकदाच भरपूर वाढून घेण्यापेक्षा लागेल तसे थोडे थोडे वाढून घेण्याची सवय सर्वांनीच लावून घ्यायला हवी. या सवयीमुळे अन्न वाया जाण्याचे टळते.
अन्नाची नासाडी वेगवेगळ्या पातळ्यांवर होते – अगदी उत्पादनापासून अन्नावरील प्रक्रिया, अन्नाचे पॅकेजिंग, अन्नाची वाहतूक आणि अन्नाचे सेवन इथपर्यंत. भारतामध्ये एकूण उत्पादन झालेल्या अन्नापैकी जवळपास 22% अन्न वाया जाते.
लग्न-समारंभांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, हॉस्टेल्स आणि हॉटेल्समध्ये अन्नाची सर्वाधिक नासाडी होते. हे टाळण्यासाठी काही सेवाभावी संस्था सार्वजनिक कार्यक्रमांनंतर उरलेले अन्न गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवतात.
यासाठी शासनानेही पुढाकार घ्यायला हवा, गरजूंना असे अन्न माफक दरात अथवा मोफत मिळेल अशी व्यवस्था करायला हवी. सर्वच पातळ्यांवर लोकसहभाग वाढवायला हवा.
घरी राहिलेले जास्तीचे अन्न कोणाला देता येत नसेल तर ते आपण विविध प्रकारे वापरू शकतो. राहिलेल्या अन्नात काही घटकपदार्थ, मसाले मिसळून त्यांचा एखादा वेगळा पदार्थ बनवता येऊ शकतो.
शिल्लक राहिलेला पदार्थ योग्य पद्धतीने, योग्य तापमानात फ्रीजमध्ये ठेवल्यास तो चांगला व अधिक काळ टिकू शकतो. खराब व्हायला लागलेल्या अन्नाचे कंपोस्ट खत करता येऊ शकते.
अन्न शिल्लक राहण्याचे टाळण्यासाठी किराणामालाची यादी करा आणि घरी करायच्या स्वयंपाकाचा योग्य अंदाज घ्या. आणि अर्थातच आपले ताट स्वच्छ करायचे विसरू नका!!