दातांच्या स्वच्छतेची काळजी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने घेत असतो, पण तरीही दातांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस जाणवत आहेत. नवीन संशोधनानुसार दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तुम्ही तुमचे दात रोज ब्रश करीत असलात तरी तुमच्या तोंडात अनेक धोकादायक बॅक्टेरियांची वाढ होत असते. त्याचा परिणाम हा हिरड्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे ब्रश करताना दातांमधून रक्त येते, हिरड्या दुखायला लागतात. दातांची योग्य ती काळजी घेतली नाही तर संपूर्ण शरीराचे आरोग्य धोक्यात येऊ शकते हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
ज्या लोकांना हिरड्यांचे आजार जास्त प्रमाणात होतात त्यांना हृदयाचा कोरोनरी आरट्री डिसीज होण्याची शक्यता दुप्पट असते. तो का होतो याचे कारण संशोधकांना सापडले नसले, तरी तोंडात तयार झालेले बॅक्टेरिया हे तुमच्या रक्तात प्रवेश करतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधे चिकटून बसतात. तेथे त्यांची वाढ झाली आणि त्यामुळे रक्तवाहिनीमध्ये गाठ तयार झाली तर त्याची परिणती हृदयविकारात होऊ शकते. काही संशोधकांच्या मते, दातांची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो. दातांकडे दुर्लक्ष आणि स्मरणशक्ती कमी होणे याचा एकमेकांशी संबंध आहे. तोंडातील धोकादायक बॅक्टेरिया या क्रेनियल नर्व्हज मधून मेंदूपर्यंत किंवा रक्तातून पोहोचतात. तेथे त्यांची वाढ झाली तर अल्झायमर होण्याची शक्यता वाढते.
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना पिरीयोडोन्टल हा हिरड्यांचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारण मधुमेही व्यक्तींना इन्फेक्शन होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. या हिरड्यांच्या आजारामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहात नाही. त्यामुळे हा हिरड्यांचा आजार बरा झाला तर मधुमेहींच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
हिरड्यांचा आजार वाढला तर त्याचा परिणाम श्वासनलिकेच्या इन्फेक्शनवरही होऊ शकतो. त्यामुळे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टीव पल्मोनरी डिसीज आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता वाढते. हे तोंडातील बॅक्टेरिया श्वासातून फुफ्फुसांमधे ओढले जातात. त्यामुळे श्वासनलिकेला इजा होते आणि त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. हिरड्यांच्या आजारामुळे महिलांना गर्भधारणा होण्यास वेळ लागतो. तसेच ज्या गर्भवती महिलांना हिरड्यांचे आजार होतात त्यांचा गर्भपात होण्याचा धोका वाढतो. हे सर्व संभाव्य आजार टाळण्यासाठी दाताची आणि एकूणच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी काही छोट्या छोट्या उपायांनी घेता येते.
तुम्ही दिवसातून दोन वेळा माउथवॉशने तोंड स्वच्छ धुवत असाल तर तुम्हाला हिरड्यांचा आजार होण्याची शक्यता 60 टक्के कमी होते. तोंडातील बॅक्टेरिया मरून जाण्यासाठी किमान 30 सेकंद तरी माउथवॉशने तोंड धुतले पाहिजे. ब्रश करण्यापूर्वी दातात अडकलेले अन्नकण टूथपिकने काढून टाका. त्यानंतर ब्रश केल्यामुळे दात चांगले स्वच्छ होतात.
वरील प्रकारे आपण दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे तुमच्या दातांमधून आणि हिरड्यामधून रक्त येऊ नये, त्यामध्ये वेदना होऊ नयेत, जीभेला दात खूप अणकुचीदार वाटू नयेत हे सगळे दातांच्या निगराणीवर अवलंबून आहे. ब्रश केल्यानंतर दोन तासांनंतर आपल्या श्वासातील ताजेपणा टिकून राहायला हवा. तसेच नाश्ता केल्यानंतरही काही काळ तुमचा श्वासातील ताजेपणा टिकून राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपले दात किती स्वच्छ आहेत, किती आरोग्यवान आहेत हे लगेच समजू शकते. दातांची योग्य काळजी घेऊन आपण पुढच्या मोठ्या आजारांना टाळू शकतो.
दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे संपूर्ण शरीराच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. दातांच्या समस्यांमुळे हृदयविकार, गर्भवती महिलांच्या समस्या असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. ते टाळण्यासाठी दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
योग्य टूथब्रश
मऊ किंवा अतिमऊ असलेला टूथब्रश वापरणे चांगले असते. जेव्हा एखादी व्यक्ती मध्यम किंवा कडक प्रकारचा टूथब्रश वापरते तेव्हा त्या ब्रशमुळे हिरड्या अक्षरश: सोलून निघतात. त्यामुळे हिरड्यांची दातांवरील पकड सैल होते. तुमचे दात खरोखरच स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही पूर्णपणे दोन मिनिटे दात ब्रश करणे गरजेचे आहे. दातांबरोबरच हिरड्या, जीभ त्याचबरोबर दाढा यांची स्वच्छता होणेही आवश्यक आहे. आपल्या मुलांना पूर्ण दोन मिनिटे ब्रश करण्याची सवय लावा. आपला ब्रश दर तीन महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे.
The post अनारोग्याला निमंत्रण देणारे दात appeared first on Dainik Prabhat.
